खर्डीत सोशल मीडियाचा आदर्श वापर; रेल्वे पुलाखाली बसविले आरसे,अपघात टाळण्यासाठी पुढाकार

खर्डीत सोशल मीडियाचा आदर्श वापर; रेल्वे पुलाखाली बसविले आरसे,अपघात टाळण्यासाठी पुढाकार

पंढरपूर|खर्डी| ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे गॅंग ऑफ खर्डी ग्रुपच्या माध्यमातून सोशल मीडियाचा विधायक वापर करत रेल्वे पुलाखाली आरसे बसविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होत असून परिसरात कौतुक होत आहे.

पंढरपूर तालुक्यातील खर्डी या ग्रामीण तीर्थक्षेत्रात सोशल मीडियाचा सकारात्मक आणि विधायक वापर करून एक आदर्श निर्माण करण्यात आला आहे.गॅंग ऑफ खर्डी या व्हॉट्सॲप समूहाच्या माध्यमातून गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि प्रशासनिक विषयांवर माहिती देत जनजागृती केली जाते.

गावातील समस्या गावातच सोडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या या समूहाने उंबरगाव-खर्डी रेल्वे पुलाखाली धोकादायक वळणावर अपघात टाळण्यासाठी परावर्तित आरसे बसविण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त ग्रामस्थांकडून लोकवर्गणी गोळा करण्यात आली असून सुमारे १८ हजार रुपये जमा झाले.

या उपक्रमास पंढरपूर रोटरी क्लब अध्यक्ष डॉ.वैभव सादगिले तसेच मयुरेश परिचारक यांचेही सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीने गावकऱ्यांसह एकूण सहा आरसे बसविण्यात आले. या आरशांमुळे उंबरगाव, बोहाळी, शिरभावी, पाटील मळा परिसरातील वाहनचालक, शाळकरी मुले, पादचारी आणि भाविकांना मोठा फायदा होत आहे.

या उपक्रमासाठी ग्रामस्थांनी दहा रुपयां पासून ते हजार रुपयांपर्यंत देणगी देत सक्रिय सहभाग नोंदविला. सोशल मीडियाच्या माध्यमातून गावातील सुमारे ६० हून अधिक विधायक कामे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे प्रवर्तक अमोल कुलकर्णी, अनिल कांबळे तसेच ग्रामस्थ आणि मिस्त्री रवी शिंदे (करकंब) यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर केल्यास गावातील अनेक समस्या स्थानिक पातळीवरच सोडविता येतात, हे या उपक्रमातून सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Back To Top