मल्लेवाडी येथे हल्ला मारहाण,जातिवाचक शिवीगाळ व सोन्याची चैन हिसकावल्याचा गंभीर गुन्हा
मंगळवेढा तालुक्यातील मल्लेवाडी येथे 40 वर्षीय व्यक्तीला मारहाण, जातिवाचक शिवीगाळ व 1 तोळा सोन्याची चैन हिसकावल्याची घटना उघडकीस.तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल
मंगळवेढा|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०४/ २०२६ –मल्लेवाडी ता.मंगळवेढा येथे दलित व्यक्तीवर मारहाण, जातिवाचक शिवीगाळ व सोन्याची चैन हिसकावल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मंगळवेढा पोलीस ठाणे येथे गु.र. नं. 224/2026 नुसार भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी आनंद आप्पासो रायबाण (वय 40, रा. मल्लेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास मल्लेवाडी गावातील चौकात आरोपी विनायक भाऊसाहेब पाटील, शुभम अरुण सोलनकर आणि अजित सिताराम माळी सर्व रा.मल्लेवाडी यांनी तू आमची बदनामी करतोस असे म्हणत फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली.
तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, शुभम सोलनकर याने फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे 1 तोळा सोन्याची चैन हिसकावून घेतली.त्यानंतर तिघांनी हातात काठ्या घेऊन फिर्यादीच्या पाठीवर, हातांवर व पायांवर मारहाण केली.
यावेळी फिर्यादी हा अनुसूचित जातीतील असल्याचे माहित असतानाही आरोपींनी त्याच्याशी जातिवाचक अपमानास्पद शब्दांत शिवीगाळ केली. तसेच तुला गावात राहू देणार नाही अशा स्वरूपाची धमकी देत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेत फिर्यादी स्वतः जखमी झाला असून प्रकरणाचा पुढील तपास मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

