अनेकांतवादी जगणे :समस्यामुक्तीचे रामबाण औषध..! प्रा. एन.डी.बिरनाळे
अनेकांतवाद : समस्यामुक्त जीवनाचा रामबाण मार्ग; भगवान महावीर यांच्या विचारांची आजच्या जगाला गरज
सांगली| ज्ञानप्रवाह न्यूज –भ.महावीरांचे जन्मकल्याणक मोठ्या उत्साहात जगभर साजरे झाले.वर्धमानांचे जन्म कल्याणक वर्षातून एकदा अथवा केवळ पंचकल्याणक पूजा महोत्सवातच साजरे करणे नव्हे तर त्याचबरोबर ते दररोज साजरे केले पाहिजे. भ. महावीरांनी प्रतिपादन केलेला अनेकांतवाद म्हणजे जगाकडे किंवा सत्याकडे बघण्याचा बहुआयामी आणि सापेक्ष दृष्टिकोन होय. प्रत्येक वस्तू किंवा विचाराला अनेक पैलू असतात, केवळ एकाच बाजूने सत्य ठरवता येत नाही, असे हा सिद्धांत सांगतो. हा विचार सहिष्णुता, अहिंसा आणि परस्परांचा आदर शिकवतो.
अनेकांतवादाची मुख्य वैशिष्ट्ये :
सापेक्षता (Relativity): सत्य हे सापेक्ष असते. एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना ती आहे आणि नाही अशा दोन्ही बाजूंनी असू शकते. कोल्हापूरचे स्व.ॲड. नानासाहेब नांद्रेकर यांनी अनेकांतवाद (स्याद्वाद) या विषयावर खूप छान इंग्रजीत विश्लेषण केले होते.
वर्धमानप्रणीत जैन सिध्दांत सांगतो अनेकांतवाद म्हणजे अनेक दृष्टिकोन. एकाच विषयाकडे पाहण्याचे अनेक कोन असू शकतात, सर्व मतमतांतरांना मान देणे म्हणजे अनेकांतवाद.. अहिंसा आणि समन्वय हा अनेकांतवादाचा आत्मा आहे. हा सिद्धांत वैचारिक हिंसा टाळतो. दुसऱ्याच्या मताचा आदर करून संघर्षा ऐवजी समन्वयाचा मार्ग दाखवतो. म्हणून जैनधर्म म्हणजे केवळ पूजा अर्चना किंवा कर्मकांड नव्हे.
जगात दोन महायुध्दं झाली ती अनेकांतवाद न समजल्याने..! आता सुध्दा अमेरीका – इराण युध्द सुरु आहे ते स्याद्वाद न समजल्यानेच..!
आजच्या संघर्षमय जगात,जगा आणि जगू द्या या महावीरांच्या शिकवणीनुसार (अहिंसा व अनेकांतवाद) शांतता आणि बंधुभाव निर्माण करण्यासाठी अनेकांत हा विचार अत्यंत उपयुक्त आहे. अनेकांतवाद (Dualism) म्हणजे सत्याचे अनेक पैलू असू शकतात हे मान्य करणे, ज्यामुळे जीवनात सहिष्णुता, लवचिकता आणि मानसिक शांतता येते. हा दृष्टिकोन वापरून आपण मतभेद कमी करू शकतो, इतरांचे विचार समजून घेऊ शकतो आणि संकटातही सकारात्मक राहून जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
अनेकांतवादाचा दैनंदिन जीवनात वापर केला तर संघर्ष संपतो. वैचारिक मतभेद असू द्या. पण मतभेदाचे रुपांतर मनभेदात होता कामा नये.मनभेदामुळे विनाश ओढवतो. अनेकांतवादी दृष्टीकोनात समन्वय सुरु होतो. समन्वयात शांती आणि प्रगती दडलेली असते. यासाठी लोकांचे विचार समजून घेणे आवश्यक असते. एखादी गोष्ट आपल्याला चुकीची वाटत असली तरी, ती समोरील व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बरोबर असू शकते, हे स्वीकारणे म्हणजे सहिष्णुता अंगी बाणवणे होय.
मतभेद कमी करण्यासाठी अनेकांतवाद हा एकमेव पर्याय आहे. वादविवादात मीच बरोबर ही भावना सोडून दुसऱ्याचे म्हणणेही बरोबर असू शकते (स्याद्वाद) हा दृष्टिकोन ठेवला तर व्यक्ती असो, कुटुंब असो, संस्था असो अथवा समाज किंवा देश असो.. समस्या निर्माणच होणार नाहीत. अनेकांत तत्त्वज्ञानच माणसाला समस्यामुक्त करु शकते. यासाठी संकटात सकारात्मकता ठेवून अनेकांतवाद स्विकारला की, परिस्थिती कितीही वाईट असली तरी, त्यातही काहीतरी चांगले असू शकते (उदा. अपयशातून शिकणे) असे मानून सकारात्मक राहिले की समाज समस्यामुक्त होऊ शकतो.यासाठी जीवनात विविधता स्वीकारता आली पाहिजे. जीवनात परिस्थिती,स्वभाव आणि विचार बदलत असतात, हे मान्य करून लवचिकता (Adaptability) बाळगणे आवश्यक वाटते.

अहंकार कमी केल्याशिवाय अनेकांतवादी होता येत नाही.एकाच दृष्टिकोनावर ठाम न राहता, समजूतदारपणा वाढवणे आणि अहंकार कमी करणे महत्त्वाचे आहे.थोडक्यात, अनेकांतवाद म्हणजे “माझे मत अंतिम नाही हे मान्य करून सर्वांच्या विचारांचा आदर करणे होय, ज्यामुळे जीवनात आनंद आणि शांती वाढते.
अनेकांतवाद अनुसरला तर कुटुंबातील भांडणं मिटतील. समाजात समन्वय स्थापित होऊन समाज एकसंघ राहून समाजात समस्या निर्माणच होणार नाहीत. स्याद्वाद जिथे शांती व प्रगती तेथे हे आपल्या जीवनाचे ब्रीद वाक्य झाले पाहिजे.
पाण्याने भरलेल्या घागरीला कांही जण पाण्याची घागर म्हणतील, कांही जण तांब्याची घागर म्हणतील.. संबोधन विविध प्रकारच्या असतील पण शेवटी ती घागरच आहे. म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने बरोबर असतो हे मान्य करणे(सहिष्णुता) म्हणजे अनेकांतवाद होय.भ.महावीरांचे हे जीवनोपयोगी तत्वज्ञान शाश्वत आहे. त्याला मरण नाही. म्हणूनच महावीर कधीच मरत नाही. यासाठी दैनंदिन जीवनात अनेकांतवादी दृष्टीकोन ठेवून जगलो तर वर्धमानांचे जन्म कल्याणक वर्षातून एकदाच नव्हे तर दररोज साजरे होईल. आज यासाठी वर्तमानाला वर्धमानाची गरज आहेच..!
भ.महावीरांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांना डोक्यात घेतलं की अनेकांतवादी सहज होता येईल.. यासाठी भारतरत्न,संविधान निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भ. महावीरांची प्रतिमा भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीत केंद्रस्थानी छापून घेतली. गौतम बुद्ध आणि भ.महावीर हेच जगात शांती व समता प्रस्थापित करु शकतात याच्यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रथमाचार्य शांतीसागर महाराज आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांच्या मनात हाच विचार ठासून भरला होता. समाजाच्या सर्व समस्या मिटवण्याची अद्भुत शक्ती अनेकांतवादात आहे ती संघर्ष, ईर्षा, अहंकार, आणि वादात नाही हे कळले तर जीवन फार सुंदर आहे याची अनुभूती आणि आनंद अवर्णनीय आहे एवढे मात्र निश्चित..!
प्रा. एन.डी.बिरनाळे – कार्यकारी संपादक,
दक्षिण भारत जैन सभेचे प्रगती आणि जिनविजय..

