शाळकरी मुले, पादचारी धास्तावले,पंढरपूरातील मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटावर नागरिकांचा संताप
पंढरपूरच्या उपनगरांत मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांकडून तातडीच्या कारवाईची मागणी
Pandhapur news : पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज : शहरातील सहयोगनगर, मनीषानगर, लिंक रोड,जुना कराड नाका ते शेळके वस्ती परिसरासह विविध उपनगरांमध्ये मोकाट कुत्र्यांचा वाढता सुळसुळाट नागरिकांसाठी गंभीर समस्या बनला आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती,पादचारी आणि दुचाकीस्वारांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,मोकाट कुत्रे अनेकदा सायकल व दुचाकी वाहनांचा पाठलाग करतात. तसेच रस्त्याने चालणाऱ्या नागरिकांवर आणि शाळा, शिकवणी व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर धावून जात असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी पंढरपूर नगरपालिका प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. नगरपालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
डोंबाळी यांनी सांगितले की, संबंधित परिसरात शाळा, महाविद्यालये आणि मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य नियोजन करून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आता पंढरपूर नगरपालिका प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत कुत्री चावण्याचा धोका जास्त असतो आणि रेबीज आजार होऊन जिवीतहानी संभवते त्यामुळे तातडीने कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

