मोफत ई-रिक्षा सेवेत पैसे घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई; सेवा समाप्तीसह गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू

मोफत ई-रिक्षा सेवेत पैसे घेणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर कारवाई; सेवा समाप्तीसह गुन्हा दाखल प्रक्रिया सुरू

विठ्ठल मंदिर समितीचा मोठा निर्णय; भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या चालकाविरोधात कठोर पावले

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 मे 2026 : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्या वतीने वयोवृद्ध, दिव्यांग तसेच गरोदर महिला भाविकांसाठी मंदिर परिसरात मोफत ई-रिक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसाठी BVG India Limited बीव्हिजी इंडिया यांच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने वाहन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या सेवेमधील कुणाल राजेंद्र घोडके, पंढरपूर या कंत्राटी कर्मचाऱ्याने भाविकांकडून पैसे स्वीकारल्याचा प्रकार सीसी टीव्ही चित्रिकरणात उघड झाला आहे. दि.15 मे 2026 रोजी रात्री 8.25 वाजण्याच्या सुमारास श्री संत नामदेव पायरी येथील मुखदर्शन रांगेच्या गेट क्रमांक 1 येथे हा प्रकार निदर्शनास आला.

मंदिर समितीमार्फत ई-रिक्षा सेवा पूर्णपणे मोफत असताना संबंधित कर्मचाऱ्याने भाविकांकडून पैसे स्वीकारून गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाल्याने मंदिर प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घेतली आहे.

सदर प्रकार अत्यंत गंभीर मानून संबंधित कर्मचाऱ्याची सेवा तात्काळ कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीही सुरू करण्यात आली आहे. तसेच BVG India Limited बीव्हीजी इंडिया लिमिटेड यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी दिली.

मंदिर समितीने भाविकांना आवाहन केले आहे की, मंदिर परिसरातील ई-रिक्षा सेवा पूर्णपणे मोफत असून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. जर कुणी शुल्काची मागणी करत असेल तर भाविकांनी तात्काळ मंदिर समितीकडे तक्रार नोंदवावी.

कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी स्पष्ट केले की, अशा प्रकारचे गैरप्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Leave a Reply

Back To Top