देशात २०१५ पासून १४८ परीक्षा घोटाळे; राहुल गांधींचा केंद्रावर गंभीर आरोप
पेपरफुटीने ९ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात? परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली : देशातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत २०१५ पासून देशात तब्बल १४८ परीक्षा घोटाळे झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत राहुल गांधी यांनी म्हटले की, पेपरफुटी आणि परीक्षा गैरव्यवस्थेमुळे लाखो नव्हे तर कोट्यवधी विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. नीट परीक्षा प्रकरणानंतर देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, स्पर्धा परीक्षांवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

राहुल गांधी यांच्या दाव्यानुसार गेल्या ११ वर्षांत अनेक मोठ्या परीक्षा घोटाळ्यांमुळे सुमारे ९ कोटी विद्यार्थ्यांवर परिणाम झाला.मात्र एवढ्या मोठ्या गैरप्रकारा नंतरही दोषींवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.विशेष म्हणजे, नीट पेपरफुटी प्रकरणात काही आरोपींना अटक झाली असली तरी विद्यार्थ्यांच्या मनातील भीती आणि असुरक्षितता अद्याप कायम आहे.मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळणार का? हा प्रश्न आता देशभर चर्चेचा विषय बनला आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांवरील विश्वास पूर्णपणे कमी होऊ शकतो.

