जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन. डी.बिरनाळे

जगा आणि जगू द्या सामाजिक समरसतेचा उत्कृष्ट अविष्कार..प्रा.एन.डी.बिरनाळे

सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज:कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करणं,प्रत्येकाचं अस्तित्व मान्य करणं.. मैत्रभाव व सहिष्णुतेची जोपासना करणं.. सर्वांचा आदर करणं प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचं रक्षण करणं म्हणजे समता भाव वृध्दीगंत करणं यालाच सामाजिक समरसता म्हणतात.छ.शिवाजी महाराज रयतेच्या सुख दुःखात सहभागी झाले.शोषण व पिळवणुकी तून महाराष्ट्र मुक्त केला.रयतेला जगण्याची हमी दिली.त्यांनी जनकल्याणकारी कायदे केले. स्वराज्य स्थापन करुन सुराज्य निर्माण केलं ही त्यांची सामाजिक समरसता होय. हिंसेला विरोध करुन अहिंसक समाज घडवून भ.महावीरांनी जगा व जगू द्या हा शांतीमय मंत्र दिला.भ.गौतम बुद्ध, प्रथमाचार्य शांतीसागर महाराज आणि वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनीही समाजाशी समरस होऊन समता भाव रुजवला.. सत्ता,संपत्ती हे क्षणभंगुर आहेत. सर्वांशी मैत्रभाव ठेवून एकमेकांना मदत करणं.. जात पात धर्म संपत्ती या पलिकडे जाऊन सबका मंगल ही भावना प्रबळ करणं म्हणजे सामाजिक समरसता होय.संस्था, समाज,राज्य आणि देश यांच्याशी समरस व्हा.. धर्मपरायण होऊन चांगला नागरिक बना असे प्रतिपादन प्रा.एन.डी.बिरनाळे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार व उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या आदेशा नुसार छ. शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या वीर सेवा दल मध्यवर्ती समितीच्या वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात या व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले.ना.मंगलप्रभात लोढा यांनी राज्यभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून विविध पाच विषयावर ही व्याख्यानमाला सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबवत असल्याचे सांगितले. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन केले.

वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील या कार्यक्रमात प्रारंभी शिवराज्याभिषेक सोहळा प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीराचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन अरुण पाटील हे होते.

यावेळी अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करुन यशस्वी व्हा.समाजाचं, संस्थेचं ऋण फेडा,चांगला माणूस बना, वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी मोठा त्याग केला आहे. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून स्वाभिमानी व स्वावलंबी बना असा कानमंत्र दिला.

वीराचार्य आयटीआय स्कूल कमिटी प्राचार्य सुदर्शन पाटील व त्यांच्या सर्व सहकारी स्टाफने उत्कृष्ट गुणवत्ता स्थापित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

स्वागत व सूत्रसंचालन वाडकर सर तर प्रास्ताविक पर्वराज पाटील यांनी केले. प्रा. खोत सर यांनी पाहुणे परिचय केला. आभार विशाल पाटील सर यांनी मानले. यावेळी वेलणकर अनाथाश्रमात अन्नदान शिधा वाटप केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.इलेक्ट्रीकल प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या टाॅवर लाईन व पवनचक्की प्रकल्पाचे प्रात्यक्षिक दाखवले.यावेळी प्रा. खोत,प्रा.पाटील व प्रा.वाडकर आणि दोन्ही ट्रेडर्सचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top