शालेय बस सुरक्षेवर RTO ने कठोर पाऊल उचलले : २४९ वाहनांवर कारवाई, २२ लाखांहून अधिक दंड वसूल

शालेय बस सुरक्षेवर RTO चे कठोर पाऊल उचलले : २४९ वाहनांवर कारवाई, २२ लाखांहून अधिक दंड वसूल

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य : नियमभंग करणाऱ्या शालेय बसवर संयुक्त तपासणी मोहिम

पुणे /जिमाका,दि.०५/१२/२०२५- शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत करण्यात आलेल्या तपासणीत एकूण १,४६४ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी २४९ वाहनांवर नियमभंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून २२ लाख २२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विद्यार्थी वाहतूक अत्यंत संवेदनशील विषय असल्याने शाळांनी तसेच बस चालकांनी शालेय बस नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे पोलिस आयुक्तांनी वारंवार सांगितले आहे. त्यानुसार बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, महिला कर्मचारी, वाहनचालकांची पोलीस पडताळणी आणि नेत्र तपासणी प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

शासनाच्या १६ एप्रिल २०२५ च्या आदेशानुसार सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. समित्यांकडून नियमावलीचे पालन तपासले जात आहे.

२३ ऑगस्ट २०२४ च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांवरील अनुचित प्रकार रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तिच्या अहवालानुसार शालेय वाहनांमध्ये सीसीटीव्ही, महिला कर्मचारी व पोलीस पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे.

परिवहन व पोलीस विभाग संयुक्त तपासणी मोहिम राबविणार असून दोषी वाहनांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. शाळांनी शैक्षणिक सहलीदरम्यान विशेष दक्षता घ्यावी आणि वाहनांची सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवावीत,असे आवाहन RTO नी केले आहे.

परिवहन व पोलीस विभाग संयुक्त तपासणी मोहिम सातत्याने राबवणे गरजेचे असून दोषी वाहनांवर कठोर कारवाई केली जाणे अपेक्षित आहे.कारण एखादी दुर्घटना घडली की चर्चा करण्यात येते तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते आणि काही दिवसांनी पुन्हा पहिले पाढे पंचावन्न.

Leave a Reply

Back To Top