विठ्ठल सभामंडप येथे औसेकर महाराजांचे पारंपरिक चक्रीभजन भक्तिभावात संपन्न
पंढरपूरच्या श्री विठ्ठल सभामंडप येथे माघी वारीनिमित्त औसेकर महाराजांचे पारंपरिक चक्रीभजन भक्तिभावात संपन्न झाले. हजारो भाविकांची उपस्थिती व थेट प्रक्षेपणामुळे भाविकांना घरबसल्या दर्शनाचा लाभ.
Pandharpur VitthalRukmini mandir news: पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : आषाढी, कार्तिकी,माघी व चैत्री अशा चार प्रमुख वाऱ्या पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. त्यापैकी माघी वारी सध्या संपन्न होत असून या काळात श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिराशी संबंधित प्राचीन धार्मिक परंपरांचे कटाक्षाने पालन करण्यात येत आहे.

माघ शुद्ध त्रयोदशीच्या दिवशी श्री विठ्ठल सभामंडप येथे ह.भ.प. औसेकर महाराज यांचे पारंपरिक चक्रीभजन संपन्न होण्याची परंपरा आहे. त्यानुसार शुक्रवार, दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री विठ्ठल सभामंडप येथे चक्रीभजन भक्तिभावाने पार पडले. सदर चक्रीभजन सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी सादर केले.
याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, व्यवस्थापक संदेश भोसले, विभाग प्रमुख संजय कोकीळ, राजेंद्र सुभेदार, राजेश पिटले, अतुल बक्षी, राजेंद्र घागरे, राजाराम ढगे, सावता हजारे, शंकर मदने यांच्यासह सुमारे एक ते दीड हजार भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शके १७१८ पासून चक्रीभजनाची ही परंपरा देगुलर येथील गुरुगुंडा महाराज यांच्याकडून संस्थानचे मूळ पुरुष सद्गुरू विरनाथ महाराज यांना प्राप्त झाली आहे. चक्रीभजन म्हणजे संसाराच्या चक्रातून व भयातून मुक्त करणारे भजन असून, या भजनात भाविक बसून तसेच उभे राहून नृत्यात्मक पद्धतीने सहभागी होतात. या भजनातून देहाची विदेही अवस्था प्राप्त होत असल्याची अनुभूती मिळते.
औसेकर घराण्याकडून सन १७९२ पासून माघ वारी काळात श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्रीभजनाची अखंड परंपरा जोपासली जात आहे. चक्रीभजनामध्ये एकूण १४ भजने सादर केली जातात, ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पूर्णतः भक्तिरसात न्हाऊन निघतो, असे औसा संस्थानचे अध्यक्ष व मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

दरम्यान श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अधिकृत संकेतस्थळ, युट्युब व फेसबुकच्या माध्यमातून करण्यात येत असून, या चक्रीभजन सोहळ्याचाही थेट प्रसार करण्यात आला.त्यामुळे हजारो भाविकांनी घरबसल्या या भक्तीमय सोहळ्याचा आनंद घेतला.

