आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत पोलीस प्रशासनाला दिल्या सूचना
सांगली हादरली.आटपाडीतील अमानुष घटनेची उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हेंकडून गंभीर दखल
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८ मार्च २०२६: सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेची गंभीर दखल डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले आहेत.
धक्कादायक घटना काय ?
आटपाडी तालुक्यातील बनपुरी (यमगर वस्ती) येथे चोरीच्या संशयावरून वडिलांनी स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलींना उलटे टांगून अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली.
यात ९ वर्षीय ऋतुजा यमगर हिचा मृत्यू तर ११ वर्षीय अनुजा यमगर गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी दादू हैबत (नाना) यमगर याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
गोऱ्हेंकडून तात्काळ हस्तक्षेप
डॉ.गोऱ्हे यांनी सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि आटपाडी पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्याशी संपर्क साधून प्रकरणाची माहिती घेतली आणि योग्य ती कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.तसेच त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जखमी अनुजाची विचारपूस केली आणि उपचार करणारे डॉक्टर आदित्य रावण यांना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा देण्याचे निर्देश दिले.

कठोर शिक्षेची मागणी
डॉ. गोऱ्हे यांनी राज्य सरकारकडे सादर केलेल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की:आरोपीवर खून आणि बाल अत्याचाराचे गुन्हे दाखल करावेत,
प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे
आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी
तपास पारदर्शक व जलदगतीने पूर्ण करावा
यावेळी पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या -जखमी अनुजाला शासकीय खर्चातून सर्वोत्तम उपचार,पुनर्वसनासाठी विशेष योजना,महिला व बाल विकास विभागाकडून सोशल इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट,ग्रामीण भागात बाल संरक्षण समित्या सक्रिय करणे,1098 बाल हेल्पलाईनचा प्रचार,रिक्त पोलीस पाटील पदांची तात्काळ भरती.
डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.अनुजाशी संवाद साधत तिला धीर देण्यात आला आणि तिच्या शिक्षणासाठी मदतीचे आश्वासन देण्यात आले.
या प्रकरणात डॉ. गोऱ्हे यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्हा संपर्क प्रमुख सुनिता मोरे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली व डॉ. गोऱ्हे यांचा दूरदृश्य प्रणालीद्वारे अनुजाशी संवाद करून दिला.यावेळी डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अनुजाला धीर दिला आणि तिच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. स्त्री आधार केंद्राच्या वतीने तिला कपडे आणि खाऊ पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रणव गुरव, जिल्हा प्रमुख शारदा गुरव आदी उपस्थित होते.
ही घटना केवळ गुन्हा नसून समाजाला जाग आणणारी आहे. बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रशासनासह समाजानेही पुढाकार घेणे अत्यावश्यक आहे.





