पंढरपूर शहरात जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात;150 प्रगणक घराघरांत जाणार
जनगणनेसाठी नागरिकांनी अचूक माहिती द्यावी – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२६- पंढरपूर शहरात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या भागाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे.नागरिकांना डिजिटल स्वगणनेसाठी 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर शनिवार, 16 मेपासून प्रगणकांकडून घराघरांत जाऊन घरयादी व घरगणनेचे काम सुरू करण्यात आले आहे.

पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी माहिती देताना सांगितले की, ज्या नागरिकांनी स्वगणना केली नसली तरीदेखील प्रगणक त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यक माहिती संकलित करतील. त्यामुळे नागरिकांनी प्रगणकांना योग्य व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे.
16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रत्यक्ष कामकाज होणार आहे. जनगणना संचालनालयाचे सहसंचालक रमेश भोसले यांनी बोहरी पेट्रोल पंप परिसरातील सुरू असलेल्या कामाची पाहणी करून प्रगणक व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथील जनगणना अधिकारीही उपस्थित होते.

पंढरपूर शहरातील जनगणना प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 25 पर्यवेक्षक आणि 150 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून, जनगणनेत अचूक माहिती देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही सांगण्यात आले.

