महाराष्ट्र–गोवा बार असोसिएशन निवडणूक : ॲड.महेश कसबे यांची उमेदवारी निश्चित; पंढरपूर वकील संघटनेचा पाठिंबा

महाराष्ट्र–गोवा बार असोसिएशन निवडणूक : ॲड.महेश कसबे यांची उमेदवारी निश्चित; पंढरपूर वकील संघटनेचा पाठिंबा

महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या Maharashtra Goa bar association निवडणुकीसाठी ॲड.महेश कसबे यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून पंढरपूर अधिवक्ता संघटनेने पाठिंबा जाहीर केला. सर्वसाधारण बैठकीत ज्येष्ठ विधिज्ञांनी कसबे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.

Pandharpur bar association news पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर अधिवक्ता संघामध्ये पदाधिकारी व सर्व सदस्यांची सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत ॲड.महेश कसबे यांची महाराष्ट्र–गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीसाठी उमेदवारी निश्चित करण्यात आली. यावेळी पंढरपूर वकील संघटनेने एकमुखाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत ठाम पाठिंबा जाहीर केला.

बैठकीचे प्रास्ताविक पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.विकास भोसले यांनी केले.ज्येष्ठ सदस्य ॲड.एस.आर. कुलकर्णी यांनी पंढरपूर अधिवक्ता संघाला दोनशे वर्षांची गौरवशाली परंपरा असून आजपर्यंत महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनच्या निवडणुकीत पंढरपूरमधून कोणीही उमेदवारी न भरल्याचे नमूद केले.ॲड.महेश कसबे यांनी हे धाडस दाखवले असून त्याबद्दल त्यांनी विशेष कौतुक करत सर्व सदस्यांनी कसबे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड.रानडे यांनी ॲड.महेश कसबे हे उत्तम नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व असून त्यांना राजकीय व संघटनात्मक जाण असल्याने ते निवडणुकीत निश्चितच विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. ॲड.बहिरट यांनी कोल्हापूर परिसरातील कसबे यांचा दांडगा जनसंपर्क निवडणुकीत फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त केले.

पंढरपूर बारचे माजी अध्यक्ष ॲड. राजेश चौगुले,ॲड. भगवानराव मुळे व ॲड.अर्जुन पाटील यांनी कोल्हापूर सर्किट बेंच (खंडपीठ) संदर्भातील आंदोलनात ॲड. महेश कसबे यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगत त्याचा निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असे स्पष्ट केले.

यावेळी ॲड.शक्तिमान माने व ॲड.प्रताप शेळके यांनी वकिलांसाठी संरक्षण कायद्याच्या (Protection Act) पाठपुराव्याची मागणी केली.ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. अखिलेश वेळापुरे यांनी ॲड.महेश कसबे हे एकटे नसून संपूर्ण बार त्यांच्या पाठीशी उभा आहे, अशी भावना व्यक्त करत सर्वांनी तन-मन-धनाने पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले.

ॲड.उदय बगल यांनी पंढरपूर अधिवक्ता संघाच्या वतीने कसबे यांच्या विजयाबाबत ठाम आत्मविश्वास व्यक्त केला.

आपल्या भाषणात ॲड.महेश कसबे यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंचचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.तसेच कनिष्ठ वकिलांना किमान दोन वर्षे स्टायपेंड मिळवून देणे, वकिलांना राज्यभर टोलमाफी, वकिल संरक्षण कायदा मंजूर करणे, विमा संरक्षण व वैद्यकीय मदत, तसेच ज्येष्ठ वकिलांसाठी पेन्शन योजना आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन दिले.

या बैठकीस पंढरपूर बारचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाळ्यांच्या गजरात सर्वांनी एकमुखाने ॲड.महेश कसबे यांना पाठिंबा दर्शविला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. शरद पवार यांनी केले.आभार प्रदर्शन बारचे उपाध्यक्ष ॲड.संजय व्यवहारे यांनी केले.

Leave a Reply

Back To Top