शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष देऊन 2.31 कोटींची फसवणूक; पालघर पोलिसांची RICH 2 MONEY कंपनीविरोधात मोठी कारवाई
पालघर जिल्ह्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष देत 2 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पालघर पोलिसांनी RICH 2 MONEY Pvt. Ltd. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पालघर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०१/ २०२६: शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्यां विरोधात पालघर जिल्हा पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
RICH 2 MONEY Pvt. Ltd. या कंपनीमार्फत गुंतवणूकदारांची तब्बल २ कोटी ३१ लाख ६५ हजार ६७८ रुपये इतकी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी दीपक बाबू वरक (वय ४२), रा. विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर यांनी पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार सन २०२३ पासून RICH 2 MONEY Pvt. Ltd. या कंपनीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून अनेक गुंतवणूकदारां कडून मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळली.मात्र गुंतवणूक केल्यानंतर कोणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३१६(२) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात रोशन चंदनलाल जैन (वय ३६), रा.बोईसर,ता.जि.पालघर याला दिनांक ०५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.४५ वाजता अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
या गुन्ह्याचा तपास पालघर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख व अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीता अथणे (नेमणूक – आर्थिक गुन्हे शाखा, पालघर) करत आहेत.
पालघर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अवास्तव परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहावे आणि कोणत्याही संशयास्पद आर्थिक व्यवहाराची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी.






