पंढरपूर चैत्री यात्रा 2026: मंदिर प्रशासन सज्ज;भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध – गहिनीनाथ महाराज औसेकर

चैत्री यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सोईसुविधा उपलब्ध:सहा अतिरिक्त पत्राशेडची निर्मिती

पंढरपूर चैत्री यात्रा 2026: मंदिर प्रशासन सज्ज;भाविकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध – गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,ता.28 :- चैत्र शुद्ध कामदा एकादशी निमित्त दरवर्षी होणारी चैत्री यात्रा यंदा दि. 29 मार्च रोजी पार पडत असून, यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांचा विचार करून श्री विठ्ठल -रूक्मिणी मंदिर समितीने सर्वंकष नियोजन केले आहे. सुलभ, सुरक्षित व जलद दर्शनासोबतच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आल्याची माहिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

यात्रा कालावधीत मंदिरातील पारंपरिक धार्मिक कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात येत आहेत. श्रीरामनवमी निमित्त नवमी दिवशी ह.भ.प. श्रीकांत महाराज पातकर (देहूकर फड बिद्रीकर मंडळी) यांचे कीर्तन संपन्न झाले. द्वादशीला ह.भ.प.आजरेकर महाराज यांचा नैवेद्य तर त्रयोदशीला ह.भ.प. गुरु बाबासाहेब आजरेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. एकादशीच्या पहाटे श्री विठ्ठल-रूक्मिणी मातेची नित्यपूजा अनुक्रमे सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व सदस्य संभाजी शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होणार आहे.

भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत आपत्कालीन व्यवस्थेची विशेष तयारी करण्यात आली आहे.सोलापूर महानगर पालिकेची रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह तैनात राहणार असून सिझफायर यंत्रणा,157 सीसीटीव्ही कॅमेरे,नियंत्रण कक्ष,वायरलेस प्रणाली, जनरेटर,मेटल डिटेक्टर,मोबाईल लॉकर, बॅग स्कॅनर मशीन, सार्वजनिक सूचना प्रणाली व चौकशी कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत. तसेच भाविकांसाठी अपघात विमा संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य सेवांसाठी पत्राशेड परिसरात तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला असून उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शन मंडप येथे आयसीयू सुविधा उपलब्ध ठेवण्यात आले आहे. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने मोफत वैद्यकीय सेवा दिली जात असून दोन अद्ययावत रुग्णवाहिका वैद्यकीय पथकासह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. स्वच्छतेसाठी मंदिर परिसर, दर्शनमंडप व तुकाराम भवन येथील कामे मंदिर कर्मचाऱ्यांमार्फत तर नगरप्रदक्षिणा मार्ग व दर्शनरांग परिसरातील स्वच्छता आउटसोर्सिंग पद्धतीने केली जात आहे. या उपक्रमात स्वकाम सेवा आळंदी व संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ आळंदी या संस्थांचे सहकार्य लाभत आहे.

अन्नछत्रामध्ये दररोज दुपारी 12 ते 2 व रात्री 7 ते 9 या वेळेत अन्नदान सुरू राहणार आहे. तसेच दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी दर्शनरांगेतील भाविकांना लिंबू सरबत तसेच तांदूळ किंवा साबुदाणा खिचडी/उपीटचे वाटप करण्यात येत आहे. दर्शनरांग व्यवस्थापन अधिक सुसूत्र करण्यासाठी स्कायवॉकपासून पत्राशेड पर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आले असून कायमस्वरूपी 4 व तात्पुरते 6 असे एकूण 10 पत्राशेड उभारण्यात आले आहेत. येथे बसण्याची व्यवस्था, मॅट, थंड पिण्याचे पाणी, तात्पुरते उड्डाणपूल, शौचालये, विश्रांती कक्ष व इतर अनुषंगीक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन कुलर व पंखे बसविण्यात आले आहेत. महिला भाविकांसाठी हिरकणी कक्ष व सॅनिटरी नॅपकिन सुविधा उपलब्ध असून श्रींचा प्रसाद म्हणून बुंदी व राजगिरा लाडू पुरेशा प्रमाणात उपलब्धक करून देण्यात येत आहेत. वेदांता, व्हिडिओकॉन व श्री विठ्ठल-रूक्मिणी भक्तनिवास येथे 361 खोल्यांमध्ये सुमारे 1600 भाविकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.

दर्शन प्रक्रिया गतिमान ठेवण्यासाठी अनुभवी कमांडोंची नियुक्ती करण्यात आली असून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजांची संख्या मर्यादित करून दर्शनाची वेळ सकाळी 6.00 ते रात्री 12.00 अशी वाढविण्यात आली आहे. सदर यात्रा निर्विघ्नपणे – सुरळीत पार पाडण्यासाठी व भाविकांना केंद्रबिंदू मानून त्यांना अधिकाधिक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सदस्य आमदार रामचंद्र कदम, शकुंतलाताई नडगिरे,डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा,संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे, नगराध्यक्षा सौ प्रणिताताई भालके,व्यवस्थापक संदेश भोसले, लेखाधिकारी मुकेश अनेचा व सर्व विभाग प्रमुख परिश्रम घेत असून, 1200 कर्मचारी व स्वयंसेवक सेवा पार पाडणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Leave a Reply

Back To Top