संत चोखामेळा समता पुरस्काराने हभप डॉ.नारायण बाबा जाधव गौरविले;डॉ. रुपाली शिंदे यांना संत सोयराबाई प्रबोधन पुरस्कार
समता,संत साहित्य व समाजप्रबोधनाचा जागर; पुण्यात संत चोखामेळा पुण्यतिथी निमित्त मान्यवरांचा सन्मान
पुणे |ज्ञानप्रवाह न्यूज : भागवत वारकरी धर्मपरंपरेतील समतेचे अखंड पुरस्कर्ते भक्तश्रेष्ठ संत चोखामेळा महाराज यांच्या पुण्यतिथी समाधी सोहळ्यानिमित्त संत चोखामेळा अध्यासन केंद्राच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात यंदाचा संत चोखामेळा समता पुरस्कार हभप डॉ. नारायण बाबा जाधव यांना तर संत सोयराबाई प्रबोधन पुरस्कार डॉ.रुपाली शिंदे यांना प्रदान करण्यात आला.ज्येष्ठ पर्यावरणवादी तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिवाजीराव मोरे महाराज देहूकर यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.
यावेळी मंचावर हभप महादेव महाराज अडसूळ, भगवान महाराज मनमाडकर, प्रा.भानुदास इंगळे,डॉ.दत्तात्रेय डुंबरे,संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

समाजप्रबोधन,वारकरी संत साहित्याचा प्रसार,समतेचे विचार आणि मानवतावादी दृष्टी जपत कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जात असल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली.
हभप डॉ.नारायण बाबा जाधव यांनी वारकरी संप्रदाय, कीर्तन-प्रबोधन आणि समाजातील वंचित घटकांमध्ये समतेचे विचार पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या कीर्तन, प्रवचन आणि सामाजिक उपक्रमांमधून संत विचारांचा प्रभावी जागर घडत असून वारकरी परंपरेतील मूल्यांचा व्यापक प्रसार होत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना संत चोखामेळा समता पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सांगितले की,संत चोखामेळा महाराज हे केवळ भक्तीचे नव्हे तर समतेचे जिवंत विद्यापीठ आहेत. त्यांच्या अभंगातून मानवता, समता आणि आत्मसन्मानाचा संदेश समाजाला मिळतो.
तसेच शिक्षण, महिला प्रबोधन आणि सामाजिक जागृती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संत साहित्य अभ्यासक डॉ.रुपाली शिंदे यांना संत सोयराबाई प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. महिलांमध्ये आत्मविश्वास,शिक्षण आणि सामाजिक भान निर्माण करण्यासाठी त्यांनी घेतलेले उपक्रम प्रेरणादायी ठरत असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
डॉ.रुपाली शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,संत सोयराबाई यांच्या विचारांमध्ये स्त्रीस्वातंत्र्य, आत्मभान आणि भक्तीची अद्वितीय ताकद दिसून येते.समाज परिवर्तनासाठी त्यांचे साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे.
संत चोखामेळा महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित या कार्यक्रमात संत साहित्य,समता,समाजप्रबोधन आणि वारकरी परंपरेच्या विचारांचा जागर करण्यात आला.कार्यक्रमात संत वाङ्मय अभ्यासक, वारकरी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि समतावादी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा. देवीदास बिनवडे यांनी केले तर आभार प्रा. भानुदास इंगळे यांनी मानले. यावेळी दत्ताभाऊ वाघमारे, परमेश्वर चव्हाण, अविनाश अभंगराव, बाळासाहेब पानसरे आदी उपस्थित होते.

