महिलांच्या सन्मानावरून महाविकास आघाडी आक्रमक; जयकुमार गोरे यांनी १० दिवसांत माफी मागावी-प्रिया बसवंती

महिलांच्या सन्मानावरून महाविकास आघाडी आक्रमक; जयकुमार गोरे यांनी १० दिवसांत माफी मागावी-प्रिया बसवंती

खासदार प्रणिती शिंदे यांच्यावरील वक्तव्याचा निषेध;नारी शक्ती वंदना ही केवळ घोषणाबाजी? – संघमित्रा चौधरी

महिलांच्या सन्मानावरून महाविकास आघाडी आक्रमक: जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याचा निषेध

सोलापूर|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ मे २०२६ :सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विषयी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्या विरोधात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.संबंधित वक्तव्या बद्दल पालकमंत्र्यांनी पुढील दहा दिवसांत जाहीर माफी मागावी अन्यथा महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख प्रिया बसवंती यांनी पत्रकार परिषदेत दिला.

प्रिया बसवंती म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची भूमी असून येथे महिलांचा सन्मान केला जातो.मात्र एका महिला खासदारा विषयी अशा प्रकारची भाषा वापरणे हे महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे आहे. महिलांचा आदर हा केवळ घोषणांपुरता न राहता तो कृतीतूनही दिसला पाहिजे अन्यथा नारी शक्ती वंदना ही घोषणा केवळ दिखावा ठरेल, अशी टीका त्यांनी केली.

काँग्रेसच्या महिला सरचिटणीस अँड. संघमित्रा चौधरी यांनीही राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवर चिंता व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी विरोधकांवर वैयक्तिक आणि अवमानकारक टीका केली जात आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी केलेले वक्तव्य केवळ एका महिला लोकप्रतिनिधीचा नव्हे तर संपूर्ण नारीशक्तीचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला.

राजकीय मतभेद असू शकतात, मात्र महिला लोकप्रतिनिधींच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल अशा स्वरूपाची विधाने करणे ही अत्यंत खालच्या पातळीची राजकीय संस्कृती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपकडून एकीकडे नारी शक्ती वंदना च्या घोषणा दिल्या जातात आणि दुसरीकडे महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरली जाते, हा दुटप्पीपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

या पत्रकार परिषदेस महिला काँग्रेस शहर अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे,शिवसेना महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी, काँग्रेसच्या महिला नेत्या तसेच महाविकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Back To Top