छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चळे-तुंगतमध्ये 1,526 सेवा वितरित

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; चळे-तुंगतमध्ये 1,526 सेवा वितरित

पंढरपूर महसूल विभागाचा लोकाभिमुख उपक्रम; एकाच छताखाली 1 हजारांहून अधिक दाखले व सेवा नागरिकांना उपलब्ध

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 11 : महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची प्रलंबित कामे जलदगतीने मार्गी लावण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत पंढरपूर तालुक्यातील चळे आणि तुंगत मंडळात एकूण 1 हजार 526 विविध सेवा व दाखल्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली.

महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये नागरिकांना एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये फेरफार प्रकरणे, सातबारा दुरुस्ती, डिजिटल सातबारा, 8 अ उतारे, विविध प्रमाणपत्रे, सामाजिक योजनांचे अर्ज, शिधापत्रिका सेवा, कृषी योजनांशी संबंधित सुविधा तसेच आरोग्य तपासणीसह अनेक सेवा देण्यात आल्या.

अभियानांतर्गत निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये फेरफार 108, सातबारा दुरुस्ती 16, डिजिटल सातबारा 384, 8 अ उतारे 312, प्रमाणपत्रे 469, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत अर्ज 05, भूसंपादन प्रकरणी पत्रके 17, अद्यावत अभिलेख 59, वर्ग दोन जमीन वर्ग एक करण्याबाबत कार्यवाही 16, सामाजिक योजना 49, शिधापत्रिका 11, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना 50, आभा कार्ड व आरोग्य तपासणी 20 तसेच ई-मोजणी फेरफार नकाशा 10 प्रकरणांचा समावेश आहे.

यामध्ये चळे मंडळातून 731 तर तुंगत मंडळातून 795 सेवा व सुविधा नागरिकांना देण्यात आल्या. महसूल विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांची शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी होत असून अनेक कामे तत्काळ मार्गी लागत असल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.

यावेळी माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील, जि.प. सदस्य गितांजली साळुंखे, पंचायत समिती सदस्य अतुल गायकवाड, सरपंच ज्ञानेश्वर शिखरे,अमृता रणदिवे, प्रांताधिकारी सचिन इथापे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, दीपक शिंदे यांच्यासह मंडळाधिकारी, तलाठी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तहसीलदार सचिन लंगुटे यांनी पंढरपूर तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महसूल समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Back To Top