सरकोलीत जुगार अड्ड्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची धाड; 8 आरोपी ताब्यात, 58 हजारांचा मुद्देमाल जप्त
यात्रा-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई; सरकोली येथे अवैध जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हा दाखल
पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे पंढरपूर तालुका पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून 8 आरोपींना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान 58 हजार रुपयांचा मुद्देमाल, मोबाईल फोन, रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून मुंबई जुगार अधिनियम कलम 12 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर |ज्ञानप्रवाह न्यूज: आगामी यात्रा व सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अवैध धंद्यांविरोधात पंढरपूर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत सरकोली येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 8 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि.10 मे 2026 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरकोली येथे ही कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगारावर रेड केली. कारवाईदरम्यान रोख रक्कम,पाच मोबाईल फोन तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणातील मुख्य आरोपी कल्याण सदाशिव भोसले वय 40, रा. सरकोली यांच्यासह इतर सात आरोपींविरोधात मुंबई जुगार अधिनियम कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे, एएसआय करे, पोलीस हवालदार सुजित उबाळे, सुहास देशमुख, दीपक भोसले तसेच पोलीस कॉन्स्टेबल संजय गुटाळ यांच्या पथकाने सहभाग घेतला.
पंढरपूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात असून आगामी काळातही अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासना कडून सांगण्यात आले.

