हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

हिवताप निर्मुलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा

पंढरपूर दि.25 – राष्ट्रीय हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन नागरी हिवताप योजनेच्या जिवशास्त्रज्ञ शुभांगी अधटराव यांनी केले आहे.

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात आला.या दिनाचे औचित्य साधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले.पंढरपूर नगरपरिषद पंढरपूर येथून भादुले चौक,नाथ चौक,चौफाळा,शिवाजी चौक, स्टेशन रोड, सावरकर चौक, बस स्थानक, रखुमाई संकुल, पोलीस स्टेशन, आठवडी बाजार या मार्गावरून ही प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये हिवताप, डेंग्यू,चिकुनगुनिया,जे.ई.(मेंदूज्वर) या सारख्या आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.तसेच या आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली.मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी गतिमान करू या लढा, मलेरिया हरविण्यासाठी या घोषणा देण्यात आल्या.

त्याचबरोबर शहरातील विविध ठिकाणी कोपरा सभा घेवून जनजागृती करण्यात आली व आरोग्य शिक्षण देण्यात आले. आठवड्‌यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे,गप्पी मासे वापर करणे,मच्छरदाणी चा वापर करणे,घरातील फ्रीज,कुलर, रांजण, डेरे, पाण्याची टाकी तसेच घराभोवती साठलेले पाणी यामध्ये डास अळी होऊ नये याबाबत प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदर प्रभात फेरीत उपमुख्याधिकारी सुनिल वाळूजकर,नागरी हिवताप योजनेचे जीवशास्त्रज्ञ श्रीमती शुभांगी अधटराव, आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक, नागरी हिवताप योजनेमधील कंत्राटी कर्मचारी, आशासेविका,गटप्रवर्तक,क्षेत्र कर्मचारी तसेच पंढरपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *