कोल्हापुरी चपलांचा जागतिक प्रवास; प्राडा–लिडकॉम–लिडकार यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ; ‘मेड इन इंडिया’ कलेक्शन फेब्रुवारी २०२६ मध्ये सादर
मुंबई,दि.११ –भारतीय पारंपरिक चर्मकलेचा अनमोल वारसा असलेल्या कोल्हापुरी चपलांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी जागतिक लक्झरी ब्रँड प्राडा, महाराष्ट्र शासनाची लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.

मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी कारागिरांचे कौशल्य थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचणार आहे.
शतकांपासून चालत आलेल्या कोल्हापुरी चपलांच्या पारंपरिक निर्मिती पद्धतींना प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाइनची जोड देण्यात येणार असून, विशेष कलेक्शन फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० आंतरराष्ट्रीय विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
या उपक्रमाला महाराष्ट्र शासनाचे भक्कम पाठबळ लाभले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार साकार झाला आहे.

हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शक्य झाला आहे.
या सहकार्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसेच बेळगावी, बागलकोट,धारवाड व बिजापूर या जिल्ह्यांतील कुशल कारागिरांना प्रशिक्षण, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध होणार आहेत.२०१९ मध्ये GI टॅग मिळालेल्या कोल्हापुरी चपलांची अस्सल ओळख आणि सांस्कृतिक मूल्य या माध्यमातून अधिक दृढ होणार आहे.

