पंढरीतील रस्ते जनतेसाठी की जनावरांसाठी ? सहयोगनगरात गुराख्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त

पंढरीतील रस्ते जनतेसाठी की जनावरांसाठी ? सहयोगनगरात गुराख्यांच्या दहशतीने नागरिक त्रस्त

रस्त्यांवर शेण,अपघातांचा धोका वाढला; यशवंत डोंबाळी यांची म्हशींच्या ने-आणेस कायमस्वरूपी बंदीची मागणी

पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/१२ /२०२५- पंढरपूर येथील जलशुद्धीकरण केंद्राशेजारील सहयोगनगर या उपनगरात गुराख्यांकडून दररोज मोठ्या प्रमाणात म्हशींची ने-आण केली जात असल्याने स्थानिक नागरिकांचे जगणे अक्षरशः अवघड झाले आहे. रस्त्यांचा वापर नागरिकांसाठी आहे की जनावरांसाठी, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

सहयोगनगरमधून दररोज सकाळ- संध्याकाळ गुराखी दमदाटीने म्हशी हाकत असल्याने संपूर्ण रस्ते शेणाने माखलेले असतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. लहान मुले शाळेला जाताना, ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडताना तसेच महिला व कामगार रोजच्या कामासाठी जाताना मोठ्या अडचणींना सामोरे जात आहेत.

रस्त्यांवरील शेण व चिखलामुळे दुचाकी वाहन घसरण्याचे प्रकार वारंवार घडत असून लहान-मोठे अपघात नित्याचे झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाने वारंवार दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या संदर्भात पंढरपूर येथील माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी ठाम भूमिका घेतली असून, सहयोगनगर मार्गे म्हशींची ने-आण कायमस्वरूपी बंद करण्यात यावी तसेच शहर व उपनगरांतील जनावरांचे अनाधिकृत गोठे तात्काळ शहराबाहेर हलवण्यात यावेत,अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी सोलापूर आणि मुख्याधिकारी,नगरपरिषद पंढरपूर यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

नागरिकांच्या आरोग्य,स्वच्छता आणि सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर असताना प्रशासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Back To Top