केळी-डाळिंब बागांचे मोठे नुकसान;नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार अभिजीत पाटील

वादळी वाऱ्याने उद्ध्वस्त पिकांची आमदार अभिजीत पाटील यांनी केली पाहणी; शेतकऱ्यांना दिलासा देत तातडीच्या पंचनाम्यांच्या सूचना

केळी-डाळिंब बागांचे मोठे नुकसान; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार अभिजीत पाटील मैदानात

Madha news:माढा|ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७ जून २०२६:माढा तालुक्यासह परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी,डाळिंब तसेच इतर फळबागा आणि शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार अभिजीत पाटील यांनी आज सकाळपासून मतदारसंघातील वडोली, आढेगाव, चांदज, टाकळी टें, गारअकोले आणि आलेगाव बु.या गावांना भेट देत नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांना धीर दिला.

पाहणीदरम्यान आमदार पाटील यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले. तसेच नुकसानाचा अहवाल शासनाकडे सादर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले.

वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या बागा जमिनीवर कोसळल्या असून डाळिंब बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात प्रशासनाने तत्परतेने काम करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

Leave a Reply

Back To Top