अपघातातून सावरत असलेल्या दिलीप धोत्रेंची राजेंद्र पवारांनी घेतली भेट
प्रकृतीची केली आस्थेवाईकपणे विचारपूस
पंढरपूर|ज्ञानप्रवाह न्यूज –पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघातात जखमी झालेल्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची बारामती ॲग्रोचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी पंढरपूर येथे भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी धोत्रे यांना धीर देत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

पुणे-मुंबई महामार्गावरील भीषण अपघातातून सावरत असलेल्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी बारामती ॲग्रोचे सर्वेसर्वा राजेंद्र पवार यांनी सोमवारी पंढरपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी दिलीप धोत्रे यांच्या आरोग्याची सविस्तर माहिती घेत त्यांना मानसिक आधार दिला.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या धोत्रे यांना वारकरी भाविकांच्या तत्परतेमुळे तातडीने उपचार मिळाले. त्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनीही त्यांची भेट घेत लवकर पूर्णपणे बरे होण्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर शहराध्यक्ष दीपक वाडदेकर, डॉ.योगेश रणदिवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भेटीदरम्यान झालेल्या मनमोकळ्या संवादात अपघाता नंतरच्या परिस्थितीवर चर्चा झाली.कठीण काळात आपुलकीने विचारपूस करणारी माणसं हेच खरे बळ असते,अशा भावना दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या.






