विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी नारायण देवकुळे, व्हाईस चेअरमनपदी सविता रणदिवे यांची बिनविरोध निवड
पंढरपूर पतसंस्थेच्या नेतृत्वाची नवी धुरा नारायण देवकुळे व सविता रणदिवे यांच्यावर सभासदांचा विश्वास
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८ जून २०२६ : श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पंढरपूर या संस्थेच्या चेअरमनपदी नारायण मच्छिंद्र देवकुळे आणि व्हाईस चेअरमनपदी सविता संजय रणदिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने संस्थेच्या नेतृत्वात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.ही निवड सोमवार दि. ८ जून रोजी तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पंढरपूर यांच्या कार्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत जाहीर करण्यात आली.

या सभेच्या अध्यक्षस्थानी एस.टी.तेलंगरे अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पंढरपूर हे उपस्थित होते. सभेला संस्थेचे संचालक बलभिम पावले, चंद्रकांत कोळी,तुकाराम कुलकर्णी, राजेंद्र सुभेदार,पांडूरंग कोले,सुनंदा देवकते,पांडूरंग बुरांडे,नारायण देवकुळे,सविता रणदिवे तसेच संस्थेचे सचिव सुरज सुधाकर तेली आणि सुशिलकुमार ढेकळे पाटील उपस्थित होते.
संस्थेचे विद्यमान चेअरमन बलभिम राजाराम पावले आणि व्हाईस चेअरमन चंद्रकांत धर्माण्णा कोळी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदांसाठी विशेष निवड प्रक्रिया राबविण्यात आली. चेअरमन पदासाठी नारायण मच्छिंद्र देवकुळे आणि व्हाईस चेअरमन पदासाठी सविता संजय रणदिवे यांचे अर्ज प्राप्त झाले. दोन्ही पदांसाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने अध्यासी अधिकारी एस.टी.तेलंगरे यांनी दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.

निवड जाहीर होताच उपस्थित संचालक, सभासद आणि मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नूतन चेअरमन नारायण देवकुळे यांनी पतसंस्थेची आर्थिक प्रगती, सभासदांच्या हिताचे रक्षण आणि संस्थेचा सर्वांगीण विकास यासाठी सर्व संचालकांना विश्वासात घेऊन कार्य करण्याची ग्वाही दिली.
तर नूतन व्हाईस चेअरमन सविता रणदिवे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या कल्याणासाठी कटिबद्ध राहून काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत आणि विकासात्मक उपक्रमांमध्ये अधिक गती येईल, असा विश्वास सभासदांनी व्यक्त केला.
या निवडीबद्दल मंदिर समितीचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पतसंस्थेचे सभासद तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नूतन पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

