राजकीय न्यूज

विधिमंडळ कामकाजातील विचारमंथन निर्णयाभिमुख व्हावे- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

विधिमंडळ कामकाजातील विचारमंथन निर्णयाभिमुख व्हावे- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

मुंबई ,दि.६ फेब्रुवारी २०२४: विधिमंडळ कामकाजाच्या माध्यमातून वाद- प्रतिवाद – सुसंवाद या प्रक्रियेद्वारे लोकहितासाठीचे निर्णय- निष्कर्ष-धोरण यापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. अधिवेशन सुरू असते तेव्हा आणि त्यानंतरही या प्रक्रियेत जनतेचा सहभाग आणखी वाढायला हवा. बदलत्या काळानुसार आपले विधिमंडळही नवनवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करीत नवे रूप धारण करीत आहे. ज्येष्ठांचे सभागृह अशी ओळख असणारी विधानपरिषद तरुण सदस्यांच्या वाढत्या संख्येमुळे तरुण बनत चालली आहे, असे मत महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

आज विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय आणि यशदा, पुणे यांच्या विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच कर्मवीर काकासाहेब वाघ कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पिंपळगाव(ब), जिल्हा नाशिक येथील विद्यार्थ्यांची अभ्यासभेट आयोजित करण्यात आली. त्यावेळी मार्गदर्शन करताना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी, विधिमंडळाचे सचिव- (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवले, सह सचिव श्रीमती मेघना तळेकर,उपसभापती यांचे खाजगी सचिव रवींद्र खेबुडकर,विधिमंडळा चे जनसंपर्क अधिकारी तथा संचालक, वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र निलेश मदाने, यशदा,पुणे संस्थेच्या श्रीमती स्वाती कुलकर्णी यांसह विद्यार्थी व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात उप सभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या लोकसंख्येत निम्मे संख्याबळ असलेल्या महिलावर्गाचा राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सहभाग आणखी वाढायला हवा. प्रबळ इच्छाशक्ती असेल तर युवतीवर्ग स्वयंप्रेरणेने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देवू शकतात, त्यांनी तसे ते आवर्जुन द्यावे. अधिवेशन काळात विविध समाजघटकांनी सजग राहून लोकप्रतिनिधींमार्फत अधिकाधिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सक्रिय रहायला हवे.

यावेळी डॉ.विलास आठवले यांचे भारतीय संविधान आणि संसदीय कार्यपध्दती, श्रीमती मेघना तळेकर यांचे विविध संसदीय आयुधे आणि समिती पध्दत व निलेश मदाने यांचे महाराष्ट्र विधीमंडळाची गौरवशाली परंपरा या विषयांवर व्याख्यान झाले.

अभ्यासवर्गाच्या शेवटी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते विधानमंडळातर्फे प्रकाशित ग्रंथसंपदा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्राध्यापिका डॉ.राजश्री कटके,कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालय, पिंपळगाव,जिल्हा नाशिकचे प्राचार्य संभाजी पाटील आणि अभ्यासवर्ग समन्वयक कुणाल पाटील यांना भेट देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *