पुण्यात एसीबीचा मोठा सापळा: २ लाखांची लाच घेताना प्रांताधिकारी रंगेहात पकडले
५ लाखांच्या लाचेची मागणी करून तडजोडीनंतर २ लाख रुपये स्वीकारताना जुन्नर-आंबेगावचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे रंगेहात अटकेत
पुणे | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.28 मार्च 2026: पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत जुन्नर- आंबेगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद पंढरीनाथ शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) पथकाने शुक्रवारी मंचर येथे सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी शिंदे यांच्यासह कर्मचारी खैरनार यांनाही ताब्यात घेण्यात आले.
५ लाखांची मागणी,२ लाखांत डील
तक्रारदार असलेल्या ४८ वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या अंशतः पूर्णत्व दाखला (Completion Certificate) देण्यासाठी प्रांताधिकारी शिंदे यांनी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागितली होती.तडजोडीनंतर ही रक्कम २ लाखांवर ठरली. मात्र, लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केली.

प्रकरणाचा तपशील
तक्रारदार हे एका भागीदारी फर्मचे भागीदार असून, त्यांच्या फर्मकडे सर्व शासकीय परवानग्या व ना-हरकत प्रमाणपत्रे मिळवण्याचे अधिकार आहेत.पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे ‘जॉइंट व्हेंचर’ प्रकल्पांतर्गत इमारतीचे सुमारे ९०% बांधकाम पूर्ण झाले होते.
अंशतः पूर्णत्व दाखला मिळवण्यासाठी अर्ज प्रस्ताव नगररचना विभागाकडे पाठवला होता.ना हरकत प्रमाणपत्र मिळाले तरीही प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांनी प्रलंबित ठेवला. यानंतरच लाचेची मागणी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
एसीबीचा सापळा यशस्वी
एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.शुक्रवारी दुपारी मंचर येथे ठरलेली २ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना गोविंद शिंदे आणि खैरनार यांना रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई एसीबी चे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रांताधिकारी शिंदे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सरकारी यंत्रणेत पारदर्शकता आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी एसीबीच्या अशा कारवाया महत्त्वाच्या ठरत आहेत. या घटनेमुळे प्रशासनातील गैरप्रकार पुन्हा एकदा समोर आले आहेत.





