महिलांच्या सुरक्षेसाठी पॅनिक बटण प्रणाली प्रभावी करा; त्रुटी तातडीने दूर करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
महिला सुरक्षा अलर्ट! राज्यातील १.४० लाख वाहनांतील पॅनिक बटण तपासणीचे आदेश — डॉ. गोऱ्हे गंभीर; निष्क्रिय बटणांवर कारवाई

नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२ डिसेंबर २०२५ : राज्यातील बस,कॅब,टॅक्सी अशा सर्व प्रवासी भाडेतत्त्व वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या पॅनिक बटण व सुरक्षा प्रणालीची परिणामकारता वाढविण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्रुटी दूर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. महिला सुरक्षिततेच्या दृष्टीने ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानभवनात झालेल्या आढावा बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, वाहतूक पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, कॅब संघटनेचे प्रतिनिधी केशव क्षीरसागर, पत्रकार प्रवीण लोणकर, तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या की,पॅनिक बटण प्रणाली बसविली आहे,परंतु अनेक वाहनांमध्ये ती निष्क्रिय आहे. प्रत्येक जिल्ह्यात दररोज किमान १५ तपासण्या करून त्रुटी तातडीने दुरुस्त कराव्यात.

त्यांनी पुढील महत्त्वाच्या सूचना दिल्या :
पॅनिक बटण प्रणालीची राज्यभर नियमित तपासणी
नागरिकांमध्ये जनजागृती वाढविण्यासाठी प्रचार मोहीम
प्रणाली असलेल्या वाहनांमध्ये स्पष्ट सूचना फलक
तक्रारींसाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करणे
लाईव्ह ट्रॅकिंगवर आधारित तपासण्या
राज्यातील सध्याची स्थिती
एकूण बसवलेले पॅनिक बटण : १,४०,५९९
प्रत्यक्ष कार्यरत बटणांची संख्या : १,०१,०८६
कार्यरत नसलेली/दोषी यंत्रणा : सुमारे ३९,००० वाहने
मुंबई कंट्रोल सेंटरला मिळालेले अलर्ट : ६,३०,२५५

तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून वाहनमालकांना सूचना दिली जाते आणि प्रतिसाद न मिळाल्यास ‘११२’ वर माहिती दिली जाते, अशी माहिती परिवहन आयुक्तांनी दिली. फिटनेससाठी वाहन तपासणी करताना पॅनिक बटण अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

