हिवाळी अधिवेशनात मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट; सह्याद्री हॉस्पिटल प्रकरणी तात्काळ चौकशीचे आदेश
सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्ण मृत्यू प्रकरणाची मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश
नागपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेतली.या भेटीत पुणे हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान झालेल्या रुग्ण मृत्यू प्रकरणाची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली.

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये कै.केरू सकपाल या रुग्णावर उपचार सुरू असताना गंभीर वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचा आरोप असून उपचार प्रक्रियेत वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन झाले की नाही, रुग्णाला वेळेत योग्य उपचार मिळाले का, तसेच हॉस्पिटल प्रशासनाची भूमिका काय होती,याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या संदर्भात मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केलेल्या निवेदनात संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.रुग्णाच्या मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय तज्ज्ञ समिती (Independent Medical Board) नेमण्यात यावी तसेच दोषी डॉक्टर,कर्मचारी व हॉस्पिटल प्रशासनावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी ठोस मागणी करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशीचे आदेश दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात यावेत,असे स्पष्ट निर्देश दिले.

राज्यातील आरोग्य सेवा अधिक पारदर्शक,जबाबदार व रुग्णाभिमुख राहाव्यात तसेच अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
या भेटीमुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत असून आरोग्य विषयक गंभीर प्रश्नांवर राज्य शासन संवेदनशीलतेने काम करत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.






