ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळांचाच वापर करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेत स्थळांचाच वापर करा – प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम

बनावट वेबसाईट, ॲप व लिंकपासून सावध राहण्याचे वाहन चालक व मालकांना आवाहन

धुळे,दि.12 डिसेंबर 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील सर्व वाहन चालक व वाहन मालकांनी ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवांसाठी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत शासकीय संकेतस्थळांचाच वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे. सध्या ऑनलाइन माध्यमातून वाढत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी,असेही त्यांनी स्पष्ट केले.

अलीकडच्या काळात ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरण,वाहन नोंदणी,ई-चलन भरणे यासंबंधी बनावट वेबसाईट,फसवे मोबाईल ॲप तसेच एसएमएस व व्हॉट्सॲपद्वारे पाठविण्यात येणाऱ्या खोट्या लिंकच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.या प्रकारांमुळे वाहन चालक व मालकांची वैयक्तिक माहिती चोरीला जाणे,बँकिंग तपशीलांचा गैरवापर होणे तसेच ओळख चोरीसारखे गंभीर प्रकार घडत असल्याचे आढळून आले आहे.

या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या खालील अधिकृत शासकीय संकेत स्थळांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहन नोंदणी सेवेसाठी (VAHAN): https://vahan.parivahan.gov.in
ड्रायव्हिंग लायसन्स सेवेसाठी (SARATHI): https://sarthi.parivahan.gov.in
परिवहन विभागाची मुख्य वेबसाईट: https://www.parivahan.gov.in
ई-चलन पोर्टल: https://echallan.parivahan.gov.in

वरील सर्व अधिकृत संकेतस्थळे gov.in या डोमेनने समाप्त होतात. नागरिकांनी .com, .online, .site, .in अशा डोमेनवरील संशयास्पद वेबसाईट उघडू नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

फसवणूक करणारे अनेकदा आपल्या वाहनावर दंड बाकी आहे, त्वरित भरा, ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड होणार आहे अशा धमकीवजा संदेशांसह अनधिकृत लिंक पाठवतात. अशा संदेशांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

परिवहन विभाग किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) कडून नागरिकांना कधीही व्हॉट्सॲपवर पेमेंट लिंक पाठविली जात नाही, याची नोंद घ्यावी. तसेच RTO service.apk, mParivahan_Update, eChallan_Pay.apk यांसारखी अनधिकृत APK ॲप डाऊनलोड करू नयेत.अशा ॲपद्वारे OTP, बँकिंग माहिती व मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरीला जाण्याचा धोका असतो.

कोणताही संशयास्पद संदेश, लिंक किंवा कॉल प्राप्त झाल्यास नागरिकांनी त्वरित खालील ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी केले आहे.

National Cyber Crime Portal: https://wwwcybercrime.gov.in
सायबर फसवणूक हेल्पलाईन: 1930
जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन

नागरिकांनी सतर्क राहून अधिकृत संकेतस्थळांचा वापर केल्यास ऑनलाइन फसवणुकीपासून निश्चितच बचाव होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Back To Top