कासेगांव येथील श्री यल्लमादेवी यात्रेची भक्तिभावात व शांततेत सांगता
कासेगाव पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.१७ डिसेंबर –पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे श्री यल्लमादेवीच्या वार्षिक यात्रेची बुधवारी भक्तिभावाच्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीच्या दिवशी सुरू झालेल्या या यात्रेला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

यात्रेच्या पहिल्या दिवशी जोगती,देवीचे जग तसेच भाविकभक्त गावाच्या वेशीतून वाजत-गाजत देवीच्या मंदिराकडे गेले. मध्यरात्री बारा वाजता देवीची विधीवत पूजा व आरती पार पडली.दुसऱ्या दिवशी नेवैद्य,नारळ,लिंबू,गंध आदी धार्मिक विधी पार पाडण्यात आले.गावातील मानकरी देशमुख व देशपांडे घराण्यांचा मान राखत नेवैद्य वाजत-गाजत अर्पण करण्यात आला. संध्याकाळी देवीची गाणी, आरती व जागरण कार्यक्रमांनी संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले.

तिसऱ्या दिवशी सकाळी देवीची पालखी मंदिरातून मानकरी वसंत देशमुख व भाऊसाहेब देशमुख यांच्या वाड्यात नेण्यात आली.मानकऱ्यांच्या हस्ते मानाची साडी-चोळी अर्पण करण्यात आली. त्यानंतर पालखी अरविंद देशपांडे यांच्या वाड्यात जाऊन संपूर्ण गावातून प्रदक्षिणा काढण्यात आली.मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून पुजारी,मानकरी व भाविक अग्नीहोम स्थळी रवाना झाले. देवीची पालखी, पुजारी,देवीचे जग व भाविकांनी अग्नीतून जात पारंपरिक विधी पूर्ण केले आणि यात्रेची भक्तिभावात सांगता झाली.

यात्रेदरम्यान ग्रामपंचायत कासेगांव व संबंधित विभागांनी स्वच्छता,पाणी,वीज व अन्य आवश्यक सेवा उत्तमरीत्या पुरविल्या.तसेच पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवत यात्रा शांततेत व सुरक्षितरीत्या पार पाडली.






