पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी साठी प्रशासन सज्ज

पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

१२ टेबलवर मतमोजणी; ९ फेऱ्यांत निकाल प्रक्रिया

पंढरपूर /उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९- पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून प्रभाग क्रमांक ७ ब साठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवार दि. २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे पार पडणार असून त्यासाठी निवडणूक प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सीमा होळकर यांनी दिली.

नगरपरिषदेच्या १८ प्रभागांसाठी एकूण १२ टेबलवर मतमोजणी होणार असून, एकूण ९ फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक मतमोजणी अधिकारी आणि एक शिपाई असे तीन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी ५३ अधिकारी-कर्मचारी तसेच अतिरिक्त २० कर्मचारी कार्यरत राहणार असून, प्रत्येक फेरी सुमारे ३० मिनिटांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरास सक्त बंदी असून, निवडणूक विभागाने दिलेल्या प्रवेश पासधारकांनाच केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे. माध्यम प्रतिनिधींना केवळ पत्रकार कक्षातच मोबाईल वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवेशावेळी पोलीस प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे.

प्रत्येक टेबलवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे व्हिडीओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात आली असून, फिरती व्हिडीओ पथकेही कार्यरत राहणार आहेत.मतमोजणी, निकाल संकलन, स्ट्रॉंगरूमवरील देखरेख आदी बाबींविषयी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.

Leave a Reply

Back To Top