इंदापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका शहा यांचे निधन : अवयवदानातून सहा जणांना जीवनदान

इंदापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका संदेश शहा यांचे निधन : अवयवदानातून सहा जणांना जीवनदान

डॉ. राधिका शहा अमर राहिल्या अवयवदानातून : इंदापूर शहरावर शोककळा

इंदापूर येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राधिका संदेश शहा यांचे निधन झाले. त्यांनी मरणोत्तर नेत्र,हृदय,किडनी व लिव्हर दान करून सहा जणांना जीवनदान दिले. आरोग्य,महिला सक्षमीकरण व समाजसेवेत त्यांचे योगदान उल्लेखनीय होते.

इंदापूर | ज्ञानप्रवाह न्यूज : इंदापूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ.राधिका संदेश शहा वय ५५ वर्षे यांचे दि.१२ जानेवारी रोजी रात्री ११.४८ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या मरणोत्तर नेत्र, हृदय,किडनी व लिव्हर दानामुळे सहा रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.त्यामुळे त्या शारीरिकरित्या आपल्यात नसल्या तरी अवयवदानाच्या माध्यमातून सदैव जिवंत राहणार आहेत.

त्यांच्या पश्चात आई,सासू,पती डॉ.संदेश शरद शहा,दोन मुली,एक मुलगा,दीर, जाऊबाई,दोन पुतणे व एक पुतणी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दि. १३ जानेवारी रोजी सकाळी पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉ.राधिका शहा या आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष तसेच दैनिक सकाळचे सेवानिवृत्त इंदापूर तालुका प्रतिनिधी व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.संदेश शहा यांच्या पत्नी होत्या.सकाळ मधुरांगण व तनिष्का व्यासपीठ या माध्यमांतून त्यांनी केंद्र संचालिका म्हणून महिला सक्षमीकरणा साठी विविध उपक्रम राबवले.

केंद्र सरकारच्या शेतकरी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांनी इंदापूर तालुक्या तील तीन गावांत केंद्र संचालिका म्हणून काम पाहत ६०० शेतकऱ्यांना गटशेतीचे प्रशिक्षण दिले.तसेच संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी सलग ३३ वर्षे मोफत आरोग्य सेवा देत एक महिना मोफत होमिओपॅथिक औषधे पुरवली.

डॉ.राधिका शहा यांनी दहा वेळा जोडीनं रक्तदान,१२०० मुलींच्या हिमोग्लोबीन तपासण्या,आरोग्य धनसंपदा विषयावर शेकडो व्याख्याने तसेच कोरोना काळात २२० रुग्णांना घरी जाऊन उपचार करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला.

होमिओपॅथीच्या प्रचारासाठी त्यांनी १०० हून अधिक मोफत शिबिरे घेतली.इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी,गोखळी व विठ्ठलवाडी ही गावे टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी इंदापूर रोटरी क्लबच्या माध्यमातून मोलाचे योगदान दिले.जपानी अल्कलाइन आयोनाइज्ड वॉटर थेरपी जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

डॉ.राधिका संदेश शहा यांच्या अकाली निधनामुळे इंदापूर शहरात हळहळ व्यक्त होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर,सामाजिक संस्था,पत्रकार व नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Back To Top