अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर :२ लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर : २ लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा:पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर Ahilyabai Holkar शेतकरी कर्जमाफी योजना,२ लाखांपर्यंत पीककर्ज माफ

महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा: २ लाखांपर्यंत पीककर्ज माफ

मुंबई / पुणे,दि.०६/०३/२०२६ : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असून यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाला प्राधान्य देत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.शेतकऱ्यांवरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवण्यासाठी ही कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकित कर्जाला लाभ

सरकारच्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेल्या पीककर्जावर ही कर्जमाफी लागू होणार आहे.पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शेतमजुरांसाठीही महत्त्वाचा निर्णय

राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आता शेतमजुरांनाही लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अपघाताच्या प्रसंगी शेतमजुरांना आर्थिक संरक्षण मिळणार असून हा निर्णय कृषी क्षेत्रातील कामगारांसाठीही दिलासादायक ठरणार आहे.

कृषी जीडीपी वाढवण्याचे मोठे लक्ष्य

राज्य सरकारने कृषी क्षेत्रासाठी दीर्घकालीन मोठे लक्ष्यही निश्चित केले आहे.२०४७ पर्यंत महाराष्ट्राचा कृषी जीडीपी ५५ अब्ज डॉलरवरून ५०० अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.यासाठी राज्यातील १० ते १५ प्रमुख पिकांसाठी एकात्मिक मूल्यसाखळी उभारण्याचा सरकारचा मानस असल्याचे सांगण्यात आले.

डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे शेतकऱ्यांना सुविधा

शेतकऱ्यांना शासकीय योजना,अनुदान आणि सेवा अधिक सुलभ पद्धतीने मिळाव्यात यासाठी MahaDBT आणि Mahavedh या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे एकात्मिक डिजिटल व्यवस्था उभारण्यावर सरकारचा भर असणार आहे.

या सर्व घोषणांमुळे राज्यातील शेतकरी आणि कृषी क्षेत्राला मोठा आधार मिळेल, अशी प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Back To Top