पंढरपुरात नियमबाह्य बुलेट सायलेन्सरवर सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांचा कारवाईचा इशारा
कर्कश सायलेन्सर बसविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम; ध्वनीप्रदूषणाविरोधात पोलिसांची कडक भूमिका
पंढरपूर: बुलेट सायलेन्सर बदलल्यास कारवाई
Pandhapur police news: पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०३/२०२६ : पंढरपूर शहरात बुलेट दुचाकीधारकां कडून कंपनीने नियमानुसार दिलेले सायलेन्सर काढून मोठ्या कर्कश आवाजाचे नियमबाह्य सायलेन्सर बसविण्याचे प्रकार वाढल्याचे समोर आले आहे.या प्रकारामुळे शहरात ध्वनी प्रदूषणात लक्षणीय वाढ होत असून नागरिकांकडून तक्रारीही वाढत आहेत.
सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या दुचाकी वाहनांवर कंपनीकडून दिलेले अधिकृत सायलेन्सरच वापरावेत. कर्कश आवाज करणारे, नियमबाह्य सायलेन्सर मोडिफाय करून बसवू नयेत.तसेच अनेक दुचाकीना नंबर प्लेट नसतात त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

ध्वनीप्रदूषणामुळे नागरिक त्रस्त
बुलेट सायलन्सरमधील फेरफारामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रुग्ण, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना या कर्कश आवाजाचा मानसिक व शारीरिक त्रास होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत आहेत.
वाहतूक शाखेकडून शहरात विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून, बुलेट दुचाकीच्या सायलन्सरमध्ये अनधिकृत बदल करून मोठा आवाज करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच ध्वनीप्रदूषण नियमांनुसार कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहनांमध्ये अनधिकृत बदल टाळावेत आणि शहरातील शांतता व पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सहकार्य करावे तसेच नंबरप्लेट वर नंबर न टाकणे अशा बाबी टाळाव्यात, असे आवाहन सहा.पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले आहे.
यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे उपस्थित होते.





