मला मॅनेज करणारा अजून जन्मलाच नाही : नितीन गडकरी Nitin Gadkari यांचा पेट्रोलियम लॉबीवर थेट हल्ला,ग्रीन एनर्जीला पाठिंबा
गडकरींचा इशारा:मी डंडा घेऊन बसलो आहे,मला मॅनेज करणारा अजून जन्मलाच नाही
पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : पर्यायी ऊर्जेच्या प्रसाराबाबत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari यांनी पेट्रोलियम लॉबीवर जोरदार टीका केली.मी डंडा घेऊन बसलो आहे, मला मॅनेज करणारा अजून जन्मलाच नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रात अडथळे आणणाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला.
पुण्यात आयोजित इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गडकरी यांनी देशाने ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची गरज अधोरेखित करत पर्यायी ऊर्जेच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला.
गडकरी म्हणाले की,देश आत्मनिर्भर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी याआधी अनेक नवीन कल्पना आणि योजना मांडल्या तेव्हा काही लोक माझ्यावर हसत होते, मला वेड्यात काढत होते. मात्र मी त्या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करून दाखवले आहे.
ग्रीन एनर्जी क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देताना त्यांनी आपली स्पष्टवक्ती शैली कायम ठेवली. मी डंडा घेऊन बसलो आहे.मला मॅनेज करणारा अजून जन्मलाच नाही. चांगले काम करा, नाहीतर मी कारवाई करेन, असे म्हणत त्यांनी उपस्थितांमध्ये हशा आणि टाळ्यांचा कडकडाट निर्माण केला.
यावेळी त्यांनी पेट्रोलियम लॉबीवर थेट निशाणा साधला.
गडकरी म्हणाले की,माझ्या विरोधात पेट्रोलियम लॉबी मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. ग्रीन एनर्जीला सहजपणे पुढे जाऊ द्यायची त्यांची तयारी नाही. मात्र अशा दबावाला आपण घाबरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की,संघर्षापासून पळ काढणाऱ्यांना यश मिळत नाही.जो लढाई सोडून पळतो तो संपतो.त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. आम्ही लढू शकतो, जिंकू शकतो आणि यशस्वीही होऊ शकतो,असे सांगत त्यांनी ग्रीन एनर्जी क्षेत्रातील उद्योजकांना धैर्याने पुढे जाण्याचे आवाहन केले.
देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी ऊर्जा स्रोत विकसित करणे ही काळाची गरज असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. यासाठी जैवइंधन, इथेनॉल, ग्रीन हायड्रोजन आणि इतर पर्यायी ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील या कार्यक्रमात गडकरी यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे आणि पेट्रोलियम लॉबीवर केलेल्या थेट टीकेमुळे राजकीय तसेच औद्योगिक क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.





