महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक जाहीर; १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान
महायुती मजबूत, महाविकास आघाडीसमोर आव्हान; विधान परिषद निवडणुकीचे गणित स्पष्ट
मुंबई | प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. १२ मे रोजी मतदान पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः दिवंगत नेते राजीव सातव यांच्या जागेवरून काँग्रेसने दावा ठोकला आहे. ही जागा काँग्रेसची असल्याचे सांगत ती पुन्हा काँग्रेसलाच देण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

सत्ताधारी महायुतीचे संख्याबळ पाहता त्यांची बाजू मजबूत असल्याचे स्पष्ट दिसते. विधानसभेतील आकडेवारीनुसार भाजपकडे १३१, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ५७ आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ४० आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे किमान ८ उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सुमारे ४६ असल्याने त्यांचा केवळ एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २३ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे. ३० एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असेल. २ मे रोजी अर्जांची छाननी होणार असून ४ मेपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे.
१२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होईल, तर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. संपूर्ण प्रक्रिया १३ मेपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या निवडणुकीतून राज्यातील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

