रहिमतपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची घोषणा

रहिमतपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारणार; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची घोषणा

महार परिषद शताब्दी वर्ष सोहळ्यात आश्वासन; सामाजिक समता आणि आंबेडकरी विचारांचा जागर

satara news : सातारा | ज्ञानप्रवाह न्यूज: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रहिमतपुर येथे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. रहिमतपुर येथे आयोजित महार परिषद शताब्दी वर्ष सोहळ्यात ते बोलत होते.

५ मे १९२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीत ऐतिहासिक महार परिषद पार पडली होती. त्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी समता स्तंभ परिसरात भव्य भीम स्मारक उभारण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे आश्वासन ना. आठवले यांनी दिले.

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यात येत असून रहिमतपुरातील स्मारक हे सामाजिक समतेचे प्रेरणास्थान ठरेल.

यावेळी संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दाही त्यांनी ठामपणे मांडला. भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून ते सर्व समाजघटकांना न्याय देणारे आहे. संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांना आंबेडकरी जनता कधीही स्वीकारणार नाही,असा इशारा त्यांनी दिला.

रिपब्लिकन पक्षाच्या विस्ताराबाबत बोलताना नागालँड आणि मणिपूरमध्ये पक्षाला मान्यता मिळाल्याचे सांगून आणखी काही राज्यांत आवश्यक मतांची टक्केवारी मिळाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला आमदार मनोजदादा घोरपडे, अशोक गायकवाड, चित्रलेखा माने,नगराध्यक्ष वैशाली माने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top