एआय तंत्रज्ञानाव्दारे वारीत होणार गर्दीचे व्यवस्थापन
वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एआय तंत्रज्ञानाची पंढरपूरात चाचणी
एआय तंत्रज्ञानाव्दारे गर्दीचे प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए.आय तंत्रज्ञानाचा वापर

पंढरपूर,दि.08 :- महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच आषाढी, कार्तिकी, चैत्री, माघी या चार प्रमुख यात्रेला लाखो भाविक पंढरीत येतात. या यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात प्रामुख्याने चंद्रभागा वाळवंट, नदीपात्र , भक्ती सागर परिसर, मंदिर परिसर, दर्शन रांग , प्रदक्षिणा मार्ग, शहरातील रस्ते या भागात वारकरी- भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, एआय तंत्रज्ञान वापराबाबतची चाचणी आज पंढरपूर बसस्थानक येथून घेण्यात आली.

वारीत गर्दीच्या व्यवस्थापनासाठी वापरण्यात येणाऱ्या एआय तंत्रज्ञानाची चाचणी आज पंढरपूर येथील बसस्थान येथून घेण्यात आली यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, प्रशिक्षित आय.पी.एस अधिकारी अंजना कृष्णन, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, विक्रांत गायकवाड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले, ड्रोन आयडीया फोर्चचे एजीएम आशिष माथूर उपस्थित होते.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी वर्षाकाठी पंढरपूरात एक कोटीहून अधिक भाविक येत असतात. आषाढी यात्राकाळात मानांच्या पालख्यांसह अनेक दिंड्या पायी पंढरपूरला येत असतात. यात्रा काळात भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शन मिळावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी प्रशासनाकडून एक महिना अगोदरच तयारी केली जाते. आता प्रत्येक वर्षी होणाऱ्या सोहळ्यात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ए. आय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आर्शीवाद, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार आहे.

या तंत्रज्ञानाव्दारे गर्दीचे प्रमाण, गर्दीची घनता मोजता येणार आहे.चेहऱ्याची ओळखी द्वारे हरवलेली अथवा मदतीची गरज असलेले लोकांची माहिती , ऑब्जेक्ट शोधणे त्यांच्या हालचालींचे विश्लेषण देखील करता येईल. गर्दीची वाढलेली घनता लक्षात येताच तत्काळ सूचना मिळेल व त्या ठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना राबवता येतील असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांनी दिली.

वारी कालावधीतील गर्दीच्या व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून प्रशासनातील अधिकारी एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत संशोधन करीत होते. त्याबाबतची चाचणी आज घेण्यात आली. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुरक्षित गर्दी व्यवस्थापन ही संकल्पना राबवली जाणार असून, एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी मोजणे, व्यवस्थापन करणे सोपे होणार असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी सांगितले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.