गर्भलिंग निदानाविरोधात कठोर पावले; दोषसिद्धी वाढविण्यासाठी डॉ.नीलम गोऱ्हे यांचा पाठपुरावा

गर्भलिंग निदान प्रकरणांतील आरोपींवर मोक्का लावण्याचा विचार; आरोग्य व पोलिस विभागाच्या संयुक्त कारवाईवर भर

गर्भलिंग निदानाविरोधात कठोर कारवाईची गरज; दोषसिद्धीसाठी पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे|ज्ञानप्रवाह न्यूज|दि.४ जून २०२६ : गर्भलिंग निदानाच्या वाढत्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ आरोपींवर कारवाई करून चालणार नाही, तर न्यायालयीन प्रक्रियेत दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.

बैठकीत गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याच्या कलम २८ अंतर्गत सिव्हिल सर्जन यांना अंमलबजावणीसाठी अधिकार देण्यात आले असले, तरी कार्यवाही अधिक वेगवान आणि काटेकोर करण्यासाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सुचविले. त्यांच्या या सूचनेला आरोग्य विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला.

दीर्घकाळ प्रलंबित राहणाऱ्या प्रकरणांमुळे आरोपींना जामीन मिळून ते पुन्हा गुन्हेगारी साखळीत सक्रिय होत असल्याची बाब बैठकीत समोर आली. यावर उपाय म्हणून वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींविरोधात प्रतिबंधात्मक कारवाईसह कटकारस्थान आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लागू करण्याबाबतही विचार करण्यावर एकमत झाले.

पुणे जिल्ह्यातील अलीकडील गर्भलिंग निदान प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी दूरध्वनीद्वारे दिले. आरोपींना शिक्षा झाल्यास अशा बेकायदेशीर प्रकारांना मोठा प्रतिबंध बसेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.

गर्भलिंग निदानाच्या घटनांमागील संपूर्ण गुन्हेगारी साखळी उघड करण्यासाठी आशा व अंगणवाडी सेविकांची विशेष पथके तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच रुग्णवाहतूक करणारे रिक्षाचालक, ट्रक चालक आणि इतर वाहतूक क्षेत्रातील घटकांनाही जनजागृती मोहिमेत सहभागी करून घेण्याचा प्रस्ताव मांडला.

सीमावर्ती आणि आंतरजिल्हा भागांमध्ये अशा घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येत असल्याने आरोग्य व पोलिस विभागाने संयुक्तपणे काम करून संबंधित गुन्हेगारी साखळी मोडून काढावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली.जुन्या प्रकरणांतील फरार आरोपींवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ एम्पल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली बडदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ.विजय कंदेवाढ, अतिरिक्त संचालक डॉ.संदीप सांगळे,पोलीस उपअधीक्षक बापूराव धडस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच २०१७ मधील दौंड तालुक्यातील बिरोबावाडी गर्भलिंग निदान प्रकरणाचाही विशेष आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Back To Top