बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापण्याचा प्रस्ताव हास्यास्पद; आमदार सत्यजीत तांबे यांची टीका
प्रतीकात्मक उपाय नव्हे,सक्षम यंत्रणा व जनजागृती हवी; बालविवाह प्रतिबंधावर सत्यजीत तांबे यांची भूमिका
बालविवाह रोखण्यासाठी राज्य शासन लग्नपत्रिकांवर नवरा-नवरी ची जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी या प्रस्तावावर जोरदार आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रतीकात्मक उपायांपेक्षा प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक जनजागृती अधिक महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई | ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ जून २०२६ : राज्य शासन बालविवाह रोखण्यासाठी लग्नपत्रिकेवर नवरा- नवरीच्या नावापुढे जन्मतारीख छापणे बंधनकारक करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.या प्रस्तावावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्यासाठी असा निर्णय हास्यास्पद ठरू शकतो,असे म्हटले आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की,बालविवाह हा गंभीर सामाजिक प्रश्न असून त्यावर उपाय म्हणून कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, सक्षम प्रशासकीय यंत्रणा, स्थानिक स्तरावरील देखरेख आणि व्यापक जनजागृती मोहिमा राबविणे अधिक गरजेचे आहे.केवळ लग्नपत्रिकेवर जन्मतारीख छापणे बंधनकारक केल्याने बालविवाहाचे प्रमाण कमी होईल, असे मानणे वास्तववादी ठरणार नाही. महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा देणारे निर्णय घेतले आहेत. इतर राज्यांतील पद्धतींची नुसती नक्कल करण्याऐवजी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीला साजेसे आणि परिणामकारक निर्णय घेणे आवश्यक आहे,असे आमदार सत्यजित तांबे यांनी नमूद केले.

त्यांनी पुढे सांगितले की, बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संघटना, महिला बचत गट, शिक्षक आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक आहे. अशा समन्वित प्रयत्नांमुळेच समाजात जागृती निर्माण होऊन बालविवाहासारख्या प्रथांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येईल.
राज्य शासनाने केवळ प्रतीकात्मक उपाययोजनांवर भर न देता, बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि सामाजिक स्तरावर जागरूकता वाढविणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, अशी मागणीही तांबे यांनी केली.

