अफगाणिस्तानविरुद्धच्या करो या मरो सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल, पाहा कोणाला मिळाली संधी…
अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल होतील, अशी अपेक्षा होती. आतापर्यंत भारतीय संघाने अनुभवी आर. अश्विनला एकाही सामन्यात संधी दिली नव्हती, तर दुसरीकडे भारताचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत होता. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी अश्विनला संधी दिली जाईल, असे म्हटले जात होते. कारण अश्विनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर अश्विनने आतापर्यंत भारताला बरेच सामने जिंकवूनही दिले आहेत. त्याचबरोबर अश्विन हा कोणत्याही खेळपट्टीवर विकेट्स मिळवून शकतो. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची जोडी आतापर्यंत क्रिकेट विश्वात चांगलीच चमकलेली आहे. या दोघांनी एकत्रितपणे भारतासाठी भरीव कामगिरी केलेली आहे. त्यामुळे जडेजाच्या जोडीला आजच्या सामन्यात अश्विन खेळेल, असे वाटत होते.
भारतीय संघात दुसरा बदल म्हणजे सूर्यकुमार यादवचे पुनरागमन. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सूर्यकुमारच्या पाठीत उसण भरली होती आणि त्यामुळे तो हॉटेलमध्येच आराम करत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आता या महत्वाच्या सामन्यात सूर्यकुमारचे संघात पुनरागमन होईल, असे म्हटले जात होते. पण त्याला कोणाच्या जागी संघात स्थान द्यायचे, हा सर्वात मोठा प्रश्न भारतीय संघापुढे असल्याचे म्हटले जात होते. कारण इशान किशन आतापर्यंत विश्वचषकात फक्त एकच सामना खेळला आहे. दुसरीकडे हार्दिक पंड्याकडून संघाला फार मोठ्या अपेक्षा होत्या, पण विश्वचषकातील दोन्ही सामन्यांमध्ये हार्दिकला संधी असूनही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर हार्दिक हा सातत्याने चाहत्यांकडून ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हार्दिकला संघाबाहेर काढून सूर्यकुमारला खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापन घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.