राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले आवाहन

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हुतात्मा स्मारकाला अभिवादन महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा

राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावण्याचे केले आवाहन

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१ मे २०२४: महाराष्ट्रात सर्वत्र ६५वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे.यानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या १०६ हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.

ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही वाया जाऊ देणार नाही. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सरकारने अनेक योजनांना चालना देऊन राज्याची प्रगती केली असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की,कामगारांच्या लढ्यामधून जे अधिकार मिळाले त्याची आठवण म्हणून आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जातो.इथून पुढच्या काळात देखील कामगारांच्या कल्याणासाठी विधान भवनातून त्यांच्या हिताचे निर्णय घेण्याकरीता प्रयत्न करणार असल्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

देशात सर्वत्र लोकसभा निवडणुका सुरू आहेत. सरकारने मतदानासाठी सुट्टी दिली असल्याने नागरिकांनी त्या दिवशी बाहेरगावी फिरायला न जाता मतदानाचा हक्क नक्की बाजवावा आणि देशाचा विकास करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहनही उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागरिकांना केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *