अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार – अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले

पंढरपूर अग्निशमन सेवा सप्ताह सुरु

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19/04/2024- केंद्र शासन निर्देशानुसार १४ ते २० एप्रिल हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रसह संपूर्ण भारतात सेवा दिवस व २३ एप्रिल हा सेवा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.दि.१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदी एस एस फोर्ट स्टिकिन या जहाजावर स्फोट होऊन अग्निशमन चे कार्य करत असताना अग्निशमन दलाचे ६६ अधिकारी व कर्मचारी यांना आपले प्राण गमवावे लागले. तसेच वेळोवेळी अग्निशमनाचे कार्य करत असताना अग्निशमन दलातील जवानांना हुतात्म्य प्राप्त होते.केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार १४ एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिवस म्हणून तसेच १४ ते २०एप्रिल अग्निशमन सेवा सप्ताह म्हणून पाळण्यात येतो.

या निमित्ताने पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने भक्तिमार्ग येथील अग्निशमन केंद्रामध्ये पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या हस्ते शहिदांचे स्मृतीस पुष्पगुच्छ अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन निधी संकलनाची सुरुवात करण्यात आली.

अग्निशमन सेवा सप्ताह कालावधीत जनतेमध्ये अग्निशमना विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरांमध्ये अग्निशमन वाहनांची रॅली तसेच शाळा,महाविद्यालय, कॉलेज इत्यादी ठिकाणी अग्निशमन प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे अग्निशमन अधिकारी संभाजी कार्ले यांनी सांगितले.

या कार्यक्रमास पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी अँड.सुनील वाळुजकर आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर व इतर विभाग प्रमुख ,कर्मचारी तसेच अग्निशमन विभागाकडील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *