मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त
मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
नवी दिल्ली,दि 08/01/2025: मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्या बाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती श्री सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे तसेच ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप ढवळ व राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.शामकांत देवरे उपस्थित होते.
मराठी भाषेचं स्वप्न पूर्ण
श्री सामंत यांनी या ऐतिहासिक प्रसंगी आनंद व्यक्त करत पत्रकारांना माहिती देत सांगितले, ११ वर्षांपूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवला होता. तेव्हा ते मराठी भाषेचे राज्यमंत्री होते. याबाबतची अधिसुचना आज स्वीकारताना त्याच विभागाचा कॅबिनेट मंत्री आहे, हा मोठा योगायोग आहे. महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला हा मान मिळाल्याचा अभिमान असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदींना महाराष्ट्राचे आभार
महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत मंत्री सामंत यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद दिले.
मराठी भाषेच्या विकासासाठी निधीची मागणी
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री श्री शेखावत यांच्याशी झालेल्या भेटीमध्ये श्री सामंत यांनी महाराष्ट्राच्या प्राकृत भाषेला निधीची अधिक उपलब्धता करून देण्याची विनंती केली. तसेच पुण्यात होणाऱ्या आगामी विश्व मराठी संमेलनाला श्री. शेखावत यांनी येण्याचं मान्य केलं असल्याची माहिती त्यांनी योवळी दिली. “दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पाठीशी राज्य शासन उभे असल्याचे ही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.
पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजात भाषेचा दर्जा हा महत्वाचा टप्पा ठरला आहे. मागील वर्षीपासून साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाने दोन कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून यावर्षी ही तेवढीच मदत दिली जाईल, असे श्री. सामंत म्हणाले.
दिल्लीतील मराठी शाळांसाठी प्रयत्न
दिल्लीतील मराठी शाळा सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकार विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासन श्री. सामंत यांनी यावेळी दिले.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.