३८० व्या हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्वराज्य कुंभमेळा

३८० व्या हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त (चैत्र शुद्ध सप्तमी) श्री क्षेत्र रायरेश्वर येथे स्वराज्य कुंभमेळा

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०२-०४-२०२५ –चैत्र शुद्ध सप्तमी ३८० वा हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे औचित्य साधून हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे बोधचिन्ह व स्वराज्य स्तंभ आरेखनांचे विमोचन, मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) पुस्तिकेचे अनावरण, रायरेश्वर अभंगाचे सादरीकरण, शिवकार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान आणि स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘चैत्र शुद्ध सप्तमीस’ १६४५ ला त्यांच्या सहकारी मावळ्यांसह त्या काळातील परकीय आक्रमक राजवटीविरुद्ध श्री क्षेत्र रायरेश्वर मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. या घटनेला एकुणात भारतीय इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदवी स्वराज्याच्या शपथेमध्ये भारतीय स्वातंत्र्याची बीजे पेरली गेली असे म्हणले तरी ते वावगे ठरणार नाही. २०२५ हे वर्ष ‘हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिनाचे’ ३८० वे वर्ष आहे. यावर्षीदेखील सालाबादप्रमाणे भरगच्च आणि अनोख्या उपक्रमांचे आयोजन श्री क्षेत्र रायरेश्वर रायरी, ता.भोर, जि.पुणे येथे करण्यात आले आहे.

सदर दिनाचे औचित्य साधून रायरेश्वर ग्रामस्थ संस्था – रायरेश्वर, बायोस्फिअर्स, ग्रामपंचायत – रायरी, स्वराज्याभूमी प्रतिष्ठान, रायरेश्वर स्मारक समिती आणि अनेक महाराष्ट्रातील विशेषत: मावळातील सेवाभावी संस्था यांच्या माध्यमातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हिंदवी स्वराज्य शपथ दिनानिमित्त रायरेश्वर येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. चैत्र शुद्ध सप्तमी तिथीनुसार या वर्षी शुक्रवार दि.०४ एप्रिल २०२५ ला हिंदवी स्वराज्य शपथभूमी श्री रायरेश्वर मंदिर आणि परिसरात स.६.०० ते दु. २.०० वा.पर्यंत अनेक विधायक उपक्रमांचे आयोजन केले आहे यात शंभू महादेव शिवलिंग जलाभिषेक व दुग्धाभिषेक, गड आणि ध्वज पूजन, मशाल मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक व अभिषेक, ह.भ.प. श्री. राहुल महाराज पार्ठे यांचे विद्यार्थी मिरवणूक, हिंदवी स्वराज्य शपथ दिनाचे बोधचिन्ह व हिंदवी स्वराज्य स्वराज्य स्तंभ आरेखनांचे विमोचन,मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) – अर्थात परकीय जैविक आक्रमणविरोधी चळवळी विषयक पुस्तिकेचे अनावरण, श्री. लक्ष्मण शिंदे लिखित रायरेश्वर अभंगाचे सादरीकरण, शिवकार्यात योगदान देणाऱ्या प्रातिनिधिक संस्थांचा सन्मान तसेच ग्रामस्थांकडून सरदार घराण्यांचा सन्मान,संदीप खाटपे यांचे शिव-व्याख्यान, शिवशाहीर डॉ. पुरुषोत्तम राऊत यांचे पोवाडा सादरीकरण, स्वराज्य कुंभमेळ्याचे आयोजन, अश्या अनेक उपक्रमांची पर्वणी असणार आहे. सदर उपक्रमात हिंदवी स्वराज्य शपथ घेताना छत्रपती शिवरायांसोबत त्याकाळी असलेली सरदार घराणी, सहकारी मावळे यांचे वारसदार प्रतिनिधी आणि शिवविचारांनी प्रेरित असणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी, संत, अभ्यासक, अधिकारी, लोकप्रतिनिधी, साहित्यिक, कलाकार इ. मोठ्या संखेने उपस्थित राहणार आहेत. तसेच हा अनोखा हिंदवी स्वराज्य शपथ दिन अर्थात स्वराज्याचा सोहळा दरवर्षी चैत्र शुद्ध सप्तमीस शासकीय स्तरावर साजरा करावा याबाबतचा विनंतीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, पुणे यांच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला पाठवला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय हा शासनाच्या विचाराधीन आहे. त्याला शासनाकडून लवकरात लवकर मान्यता मिळाल्यास ती खऱ्या अर्थाने छत्रपती शिवराय व १८ पगड जातीतील सहकारी मावळ्यांना यथोचित अभिवादन ठरेल अश्या सर्व शिवभक्तांच्या भावना आहेत अशी माहिती डॉ.सचिन अनिल पुणेकर,दत्तात्रय जंगम,सुनील चिकणे,सचिन देशमुख,युवराज राजे जेधे यांनी दिली आहे.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading