भाळवणीत अज्ञातांकडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्या तील भाळवणी येथील भाळवणी शेळवे रस्त्यावरील शेतकऱ्यांचे अज्ञातांकडून मोठे नुकसान केले जात आहे यात पाईपलाईन फोडणे, ऊस जाळणे, बग्यास जाळणे , बोरची मोटर तोडून बोअर मध्ये सोडणे, जनावरांच्या चाऱ्याचा गंजी पेटवून देणे असे प्रकार वारंवार केल्या जात आहेत. यामुळे या भागातील शेतकरी भयभीत झाले असून पोलीसांत रीतसर तक्रार करूनही पोलीस कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी पोपट एकतपुरे यांच्या केळीच्या पिकांसाठी आणलेल्या उसाचे बग्यास रात्री पेटवून देण्यात आले .नंदकुमार कापसे यांच्या शेतातील मकवानाची गंज रात्री पेटवून दिली. जगन्नाथ शिंदे यांच्या शेतातील ऊस पेटवून दिला मात्र सावधानतेमुळे पेटलेला ऊस विझवण्यास यश आले. प्रशांत माळवदे यांच्या बोर मधील मोटार, पाईप, केबल, दोरी कट करून मोटार बोर मध्ये सोडून देण्यात आली.देविदास लिंगे यांच्या शेतातील चेंबर , सेंचुरी फोडून इतरत्र नेऊन टाकण्यात आली. दिलीप वाघमारे यांच्या विहिरीवरील मोटार , पाईपलाईन, बोरची पाईप लाईन तोडून टाकण्यात आली. मोहन वाघमारे यांच्या शेतातील मोटारीच्या पेटीला करंट देण्यात आला होता सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही तसेच ऊसही पेटवून देण्यात आला आहे. चंद्रकांत शिंदे यांच्या शेतातील मकवानाची गंज पेटवून देण्यात आली. घराजवळ जादू टोना करून लिंबू,सुई, दाबन,खिळे,बाहुल्या टाकल्या जात आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही गेल्या दोन दिवसात दिलीप वाघमारे व वैभव वाघमारे यांच्या शेतातील ठिबक, पाईपलाईन जाळून खाक केली आहे. रणजीत मदने यांच्या शेतातील चेंबरचे, पाईपलाईन ची तोडफोड करण्यात आली आहे.

पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार देऊनही पोलीस कारवाई झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून तातडीने संबंधित अज्ञातांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाळवणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सदर अज्ञातांकडून आमच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांना दिलेल्या पत्रामध्ये उल्लेख असून या तक्रारींचे निवारण झाले नाहीतर १ मे रोजी पोलिस ठाण्यात समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

