आ. रवी राणा आणि भाजपकडून शिवरायांचा अपमान, त्यांनी लगोलग माफी मागावी, काँग्रेसची मागणी


अमरावती : महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला पुतला महापालिकेने काल उत्तर रात्री तिथून काढून टाकला. पुतळा बसवणे आणि पुतळा हटवणे हे दोन्ही प्रकार शिवरायांचा अवमान असून यास आ. रवी राणा आणि महापालिकेत सत्ता असलेली भाजपा संपूर्णतः जबाबदार असून शिवरायांच्या अवमानाबद्दल आता रवी राणा आणि भाजपाने माफी मागावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी केली आहे.

“महापालिकेत भाजपची सत्ता असून पुतळा बसविण्यासाठी परवानगी देणे किंवा पुतळा हटवणे हे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्यामुळे पुतळा हटवण्याचे पाप भाजपचेच असून, या सर्व प्रकारास भाजपच जबाबदार आहे. म्हणून भाजप आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा यांनी जाहीर माफी मागावी”, असं काँग्रेसने म्हटलं आहे.

“मध्यरात्री शिवरायांचा पुतळा बसवणारे आ. रवी राणा व महापालिकेत सत्ता असलेली भाजप पुतळा हटाव प्रकरणाला जबाबदार असून त्यांनी शिवरायांचा अवमान केला आहे. अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता असून महापालिकेने हा पुतळा हटवला. असे असताना भाजपचे नगरसेवक आणि रवी राणा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यावर पुतळा हटाव प्रकरणी टीका करीत आहेत. हा अव्वल दर्जाचा निर्लज्जपणा असून महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपनेच हा पुतळा हटवला. मग पालकमंत्र्यांना दोष देणे अत्यंत हास्यास्पद आहे”, असं प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी म्हटलंय.

“आमदार रवी राणा शिवरायांच्या पुतळ्यावरुन अत्यंत खालच्या दर्जाचं राजकारण करीत असून विझण्याआधी दिवा जसा जास्त वेळ फडफडतो तसं रवी राणा यांचं झालं असून आता कोणताही पुतळा रवी राणा यांना वाचवू शकत नाही, असं सांगून शिवरायांचा भव्य पुतळा अमरावती महानगरात उभारण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असेल”, असं दिलीप एडतकर म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: