बापरे… वर्ध्याच्या कदम रुग्णालयात 71 हजार मुदतबाह्य शासकीय गोळ्यांचा साठा सापडल्याने खळबळ
हायलाइट्स:
- कदम रुग्णालयात 71 हजार मुदतबाह्य शासकीय गोळ्यांचा साठा
- मोठ्या प्रमाणात औषधी साठा सापडल्याने खळबळ
- रजिस्टर, फाईल जप्त तर आज पुन्हा तपासणार कागदपत्रे
पथकाला रुग्णालयाच्या तपासणीदरम्यान मालाईन ड्रग्जचे 23 खोके, त्यात औषधीचे एकूण 2563 पॅकेट असून एकूण 71 हजार 764 गोळ्या आढळल्या आहे तर ऑक्सिटिन नामक 90 इंजेक्शन सुद्धा जप्त करण्यात आले आहे. ही सर्व औषधं शासकीय रुग्णालयाची असल्याची माहिती असून सर्व औषधं मुदतबाह्य आहेत. शुक्रवारी सकाळपासून सुरु असलेली तपासणी रात्री उशीरापर्यंत सुरु होती. याच दरम्यान, रुग्णालयातील ऑपरेशन रजिस्टर, एमटीपी रजिस्टरसह काही फाईल आणि रजिस्टर जप्त केले गेले आहेत. आज पुन्हा याठिकाणी तपासणी केली जाणार आहे.
रुग्णालयाच्या वरच डॉ. कदम यांचे घर असल्याने तेथेही शुक्रवारी तपासणी करण्यात आलीय. घरात तपासणी केली असता पोलिसांना एक कळवीटची कातडी तसंच अन्य बरंच साहित्य मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर डॉक्टर कदम यांच्या आई नागपूर येथे रुग्णालयात दाखल असून तेथे त्यांचे वडील असल्याने घराच्या एका खोलीला टाळे होते. त्या खोलीत काय दडलं आहे हे अद्याप बाहेर आलेलं नाहीय. या गुन्ह्यात सुरुवातीला डॉ. रेखा कदमसह पाच आरोपींना अटक करण्यात आली होती तर मध्यरात्री डॉक्टर नीरज कदम यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आज अटक केलेले डॉक्टर नीरज कदम हे आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. कदम रुग्णालयच्या तपासणीदरम्यान सरकारी दवाखान्यात वापरण्यात येणारे औषधी आढळल्याने आता या आर्वी येथील आरोग्य विभागसुद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.