मोदीला मारु शकतो म्हणणाऱ्या नाना पटोले यांच्या अडचणी वाढल्या, भाजप खासदाराने….


भंडारा : भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराने नवीन वर्षाची सुरुवात वादग्रस्त वक्तव्याने केली होती. ती चर्चा संपते ना संपते तोच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा वापरलीय. नाना पटोले यांच्या याच भाषेवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे तसंच त्यांना सडेतोड उत्तर देण्याचा निर्धार केला आहे. पटोले यांनी जिथे मोदींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याच भंडाऱ्याचे भाजप खासदार सुनील मेढे (BJP MP Sunil Medhe) यांनी पटोले यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पटोलेंच्या अडचणी वाढल्या आहेत.

मी मोदीला मारुही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना त्यांचा तोल ढळला. भाषणाच्या आवेशात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी आक्षेपार्ह भाषा वापरली. याच पार्श्वभूमीवर आता समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे.

‘नाना पटोले यांना अटक करा’, खासदार मेढे यांची मागणी

नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भंडारा गोंदियाचे भाजप खासदार सुनील मेंढे यांनी आपल्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस ठाण्यात पोहोचून नाना पटोले यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली असून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

नाना पटोले यांच्यावर कारवाई होणार

नवीन वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांना आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी एक रात्र कोठडीत घालवावी लागली होती. त्यानंतर आता नाना पटोले यांच्याविरोधात काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष असेल.

नाना पटोले व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?

नाना पटोले यांच्या बोलण्याची स्टाईल नेहमी आवेशपूर्ण असते. अतिशय तावातावात बोलताना ते नेहमी दिसून येतात. भंडाऱ्यातल्या सभेतला व्हायरल व्हिडीओत नाना पटोले म्हणत आहेत की, “मी का भांडतो? मी मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं ५ वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करतात. शाळा, कॉलेज करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढी वर्ष झालीय राजकारण करतोय पण एक शाळा माझ्या नावावर नाही. इथून पाठीमागे एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला कायम मदत करतोय. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या समोर उभा आहे….”

प्रवीण दरेकर नाना पटोलेंवर भडकले

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाना पटोले यांना लक्ष्य केलं आहे. नाना पटोले यांचे मोदींविषयीचे वक्तव्य भयंकर आहे. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी केली.

राजकारणात आपण एखाद्याला बोलू शकतो इथपर्यंत ठीक आहे. पण कोणाला मारु शकतो, हे वक्तव्य गंभीर आहे. नाना पटोले यांनी खरंच हे वक्तव्य केले असेल तर हा प्रकार दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अशी वक्तव्ये करत आहेत, असं दरेकर म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: