कथा प्रसिद्धी पत्रकात न लिहिलेला परिच्छेदाची – उमेश काशीकर यांचे मनोगत

कथा प्रसिद्धी पत्रकात न लिहिलेला परिच्छेदाची – उमेश काशीकर यांचे मनोगत

आधी संताप… मग कौतुकाची थाप – संतोष करंडक विजयानंतर राज्यपालांचा शिस्तीचा धडा

जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार मुंबई,महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

प्रसिद्धी पत्रकात कोणत्या गोष्टी लिहाव्या आणि कोणत्या लिहू नये याचे काही संकेत असतात.

कित्येकदा प्रसिद्धी पत्रक माध्यमांकडे जाण्यापूर्वी तपासणारे वरिष्ठ त्यातील काही गोष्टी वगळण्यास सांगतात.काही गोष्टी वरिष्ठ वगळायला सांगतीलच अशी खात्री असते म्हणून आपणहूनच वगळल्या जातात.त्यामुळे प्रत्यक्ष घटनेतील किंवा कार्यक्रमातील सर्वच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचत नाही.

कित्येकदा अश्या न लिहिलेल्या गोष्टी देखील महत्वाच्या असतात; त्यात काहीतरी आशय असतो.ही कथा आहे प्रसिद्धी पत्रकात न लिहिलेल्या, परंतु आशय असलेल्या एका परिच्छेदाची.

आधी संताप …मग कौतुकाची थाप

दिनांक २३ एप्रिल २००० रोजी त्रिशूर केरळ येथे झालेल्या ५६ व्या राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या फुटबॉल संघाने बलाढ्य केरळ संघाला हरवून अतिशय प्रतिष्ठेचा संतोष कप जिंकला होता.

मुंबईत आगमन झाल्यावर विजेत्या संघाचे सदस्य, व्यवस्थापन सदस्यांसह राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांना सदिच्छा म्हणून भेटण्यास आले होते.अलेक्झांडर हे वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. जरासाही विलंब त्यांना खपत नसे.स्वतः वेळेवर पोहोचायचे आणि इतरांनी देखील वेळ पाळावी याबाबत ते कमालीचे आग्रही होते.

विजेत्या संघाला राज्यपालांनी राजभवन येथे भेटीसाठी सकाळी साडेअकरा वाजताची वेळ दिली होती.काय अडचण आली कल्पना नाही. परंतु विजेता संघ – व्यवस्थापक हे सर्व जण तब्बल दीड दोन तासांनी साधारण दीड वाजता राज्यपालांना भेटण्यासाठी पोहोचले.

राज्यपाल महाशयांचा पारा तोवर मे महिन्यातल्या वातावरणातील पाऱ्यापेक्षा जास्त चढला होता.सर्व खेळाडू स्थानापन्न झाल्यावर अलेक्झांडर आपल्या शिस्तीप्रमाणे कोट- टाय घालून घुश्श्यातच आले.अभिनंदन वगैरे बाजूला… सुरुवातीलाच खेळाडूंना राजभवनाला येण्यास विलंब का झाला म्हणून सुनावले.

प्रॅक्टिससाठी तुम्ही विलंबाने जाऊ शकता…. पण अंतिम सामना असला, तर तुम्ही उशिरा जाऊ शकता का? नाही ना…राज्यपालांना भेटायला जाताना आपण अंतिम सामन्यासाठी जात असल्याप्रमाणे गांभीर्याने वेळेवर गेले पाहिजे,” या शब्दात उपस्थितांचा वर्ग घेतला आणि मग बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर मात्र वातावरण शांत.

तब्ब्ल ९ वर्षानंतर संतोष कप जिंकल्याबद्दल अलेक्झांडर यांनी महाराष्ट्राच्या फुटबॉल संघाचे व व्यवस्थापकांचे अभिनंदन केले.

आपण हा सामना टीव्हीवर पाहिल्याचे सांगून ज्या खेळाडूच्या एकमात्र गोलमुळे महाराष्ट्राने अंतिम सामना जिंकला, त्या स्ट्राईकर – मोहम्मद नजीबचे – त्यांनी कौतुक केले.

महाराष्ट्राचे तब्बल ६ खेळाडू भारतीय फुटबॉल संघाकडून खेळत असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन राज्य संघाने या पुढेही संतोष कप आपल्याकडेच राहील या दृष्टीने प्रयत्न करण्याचे त्यांनी आवाहन केले. बैठक संपली. प्रसिद्धी पत्रक त्यांनी तपासले व आम्ही जारी केले ! अर्थातच त्यात राज्यपालांच्या उपदेशाचा समावेश नव्हता.

दुर्दैवाने, त्या विजयानंतर गेल्या २६ वर्षात महाराष्ट्र फुटबॉल संघाने संतोष ट्रॉफी जिंकली नाही.राज्यपाल डॉ अलेक्झांडर यांनी खेळाडूंना दिलेला वक्तशीरपणाचा संदेश मात्र आजही प्रासंगिक आहे.

Leave a Reply

Back To Top